परळी:आठवडा विशेष टीम― रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांच्या निधनाची बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. फुले-शाहु-आंबेडकर व रिपाइं चळवळीचा एक उमदा आणि धडाडीचा नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत धम्मानंद मुंडे यांनी अतिशय धडाडीने काम केले. ते राजकारणात जेवढे सक्रिय होते, त्याहून अधिक सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांचे नेतृत्व चळवळीतून पुढे आले असल्याने समाजाच्या भल्यासाठी ते प्रामाणिकपणे लढत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या संघर्षात मुंडे साहेब आणि धम्मानंद मुंडे एकञ सहभागी झाले होते. अतिशय संघर्षशील बाण्याने अन्याया विरुध्द प्रहार करणारा नेता अशी त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने परळीच नाही तर मराठवाड्याने एका संघर्षशील नेत्याला गमावले आहे, त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहोत, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.