बीड: महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित शेतकरीविरोधी आणि अपमानजनक वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी नैसर्गिक आणि इतर संकटांना तोंड देत असताना, कृषिमंत्र्यांनी “भिकारीही आजकाल एक रुपया भीक घेत नाही, आम्ही मात्र शेतकऱ्यास एक रुपयांत विमा देत आहोत”, “शेतकऱ्यांना पीक विमा व अतिवृष्टीची मदत त्यांच्या मुलामुलींचे साक्षगंध व लग्न करण्याकरिता पाहिजे काय?” आणि “आता काय ठेकलईचे पंचनामे करायला लावता काय?” अशी संतापजनक विधाने केल्याचा आरोप वाकसे यांनी केला आहे. याशिवाय, “कृषीमंत्री पद म्हणजे उजाडगावची पाटीलकी होय,” असेही वक्तव्य त्यांनी केल्याचे म्हटले आहे.
वाकसे यांच्या मते, अशा बेताल वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे आणि माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मल्हार ब्रिगेडने या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली, त्यावेळी बीड जिल्हाप्रमुख विकास कोळेकर, उपजिल्हाप्रमुख तरुण वाघ, शहर प्रमुख राजेश निमन, शहर प्रमुख राहुल कराळे, युवा जिल्हाप्रमुख अभय कुंडकर, जिल्हा संघटक सुरेंद्र सातपुते, उपजिल्हाप्रमुख विशाल गडदे, युवा उपजिल्हाप्रमुख विक्की इंगोले, योगेश ताकपेरे, लक्ष्मण कोटकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा करा!
यावेळी मल्हार ब्रिगेडने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधले. शेतकरी सध्या बियाणे लिंकिंग आणि खतांच्या लिंकिंगमुळे अडचणीत आले आहेत, मात्र कृषिमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आणि खते या प्रगत राज्यात मिळत नसून, केवळ कंपन्यांच्या मर्जीप्रमाणे व्यवहार सुरू असल्याचा आरोपही मल्हार ब्रिगेडने केला. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याची मागणीही दत्ता वाकसे यांनी केली.