बीड:राम कुलकर्णी―राजकारणाच्या व्यासपीठावर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला दुरदृष्टी असल्यानंतर त्या नेतृत्वाने जनहितासाठी उचललेलं पाऊल पिढ्यानपिढ्यासाठी किती महत्वाचं ठरतं?हा अनुभव मराठवाड्यातील जनतेने घेतलेला आहे. गोदावरीचं पाणी मराठवाड्यात आडवुन गोदाकाठच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम कै.शंकरराव चव्हाणांनी केलं. पैठणचा जायकवाडी प्रकल्प मातीकामाचा आशिया खंडात पहिलं धरण म्हणुन पुढे आलं. तदनंतर अनेक धरणांची उभारणी मराठवाड्यात झाली. ज्यामुळे शंकरराव चव्हाणांची आजही आठवण घेतल्याशिवाय सिंचनाचं पान पुढे हालत नाही. तदनंतर राजकारणात रथी महारथी येवुन गेले. 1972 ला पडलेला दुष्काळ मधले वीस वर्षे सोडले तर या दुष्ट चक्राने मराठवाड्याची पाठ सोडली नाही आणि आता फार मोठ्या दुष्काळाच्या महासंकटावर मराठवाडा उभा आहे. अशीच एक प्रभावी योजना बीडच्या पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी हाती घेतली असुन जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे बीड जिल्ह्यातील धरणांत आणुन मांजराच्या पोटात टाकावे ज्यामुळं लातुर आणि मराठवाड्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल आणि दुष्काळासारखे झुगारून लावता येईल अशा प्रकारची 6700 कोटींची योजना स्वत: मंत्री पंकजाताई मुंडेंनी हाती घेतली असुन त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. हा प्रयोग सक्सेस झाला तर पिढ्यानपिढ्या मराठवाड्यातील विशेषत: बीड, लातुर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना त्याचा फायदा घेता येईल.शासन स्तरावर योजनेचा विचार सुरू झाला असुन तशा प्रकारच्या हालचाली सिंचन खात्यात वेगाने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. कै.शंकरराव चव्हाण ते पंकजाताई वर्तमान कालावधीत सुरू झालेला हा पॅटर्न एक महिला राजकिय नेतृत्वाने हाती घेवुन जगण्याच्या आशा दुष्काळात ज्वलंत केल्या आहेत.
राजकारणात सुशिक्षित आणि दुरदृष्टी नेतृत्व असेल तर त्याचा फायदा भौगोलिकदृष्ट्या आपल्या भागाला कसा होतो?याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला विकासाच्या प्रगतीत घेवुन जाताना कै.शंकरराव चव्हाणांसारख्या सुपुत्रांनी पैठणचं धरण ज्याचं नाव जायकवाडी प्रकल्प असं आहे. आशिया खंडातलं मोठं धरण मातीकामात केलेलं. गोदावरी नदी आडवुन धरण बांधलं. ज्याचा फायदा परभणी, नांदेड, जालना आणि औरंगाबाद काही प्रमाणात बीड जिल्ह्याला निश्चित झाला. अर्थात अर्धा मराठवाडा धरणाच्या पाण्याखाली आला. दुरदृष्टी ज्याचा फायदा पिढ्यानपिढ्या आज लोक घेत आहेत. शंकरराव चव्हाण ते पंकजाताई हा प्रवास आज राजकीय मोजपट्टीवर गुणात्मकदृष्ट्या शब्दबद्धित केला तर कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती ठरणार नाही अशीच आहे. तदनंतर मराठवाड्यात अनेक मुख्यमंत्री झाले. मातब्बर नेते होवुन्ा गेले.मात्र दुष्काळ दुष्काळ हाय मोकलुन सारेच रडत राहिले. पण कुणी वेगळा प्रयोग केला नाही. माजलगावच्या धरणाची उभारणी यामागे शंकरराव चव्हाण आणि स्वत: कै.सुंदररावजी सोळुंके यांचे योगदान निश्चित आहे. पंकजाताई हे नेतृत्व दुरदृष्टीचा विचार करून पावलं टाकणारा आहे. राजकारणात मागच्या चार-पाच वर्षात काम करताना बीड जिल्ह्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान न भुतो न भविष्यति. विकास निधी कसा असतो?हे त्यांच्याच काळात दाखवुन देत आहेत. रेल्वेसारखा प्रश्न असो किंवा राष्ट्रीय महामार्ग अशक्य प्रश्न सोडुन शक्य करणारं नेतृत्व राज्याच्या मंत्रीपदावर येण्यापुर्वी त्यांनी वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातुन जलयुक्त शिवार प्रकल्प हाती घेतला.ज्याचा आदर्श घेवुन सरकारने राज्यभर चळवळ हाती घेतली. जलसंधारणाच्या माध्यमातुन दुष्काळाची कामे ज्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी गावोगावी कामे हाती घेतली आणि दुष्काळी चळवळ उभा राहिली. आता मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ पडतो हे गेल्या पंधरा-वीस वर्षापासुन अनुभवाला येत आहे. रोटेशनप्रमाणे तीन वर्षाला हे दुष्ट चक्र मराठवाड्याच्या नशिबाला आज इतरत्र पावसाने थैमान घातले असताना तीन महिने झाले मराठवाड्यात पाण्याचं थेंब नाही. दुष्काळासारखा महाराक्षस प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येवुन ठेपला आहे. नाशिकहुन येणाऱ्या पाण्याने पैठणचं धरण भरलं पण पैठणच्या शिवारात पावसाचा थेंब नाही. साऱ्या मराठवाड्याला ही चिंता आहे. वर्तमान राजकारणात मिशावर ताव देवुन मराठवाड्यात विविध पक्षाचे पुढारी गेल्या अनेक वर्षापासुन काम करतात.मात्र कै.शंकरराव ते पंकजाताई अर्थात एका महिला नेतृत्वाला जलपरीचा जन्म घेवुन अतिशय दुरदृष्टी मनात ठेवुन एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतला. ज्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी अर्थात गोदावरी नदीत येणारे अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणांत आणुन तेथुन पुन्हा सिंधफणा, कुंडलिका, वाणी, मणार व मांजरेच्या धरणात टाकणे.याचाच अर्थ गोदावरीच्या पोटातलं पाणी मांजरेच्या पोटात टाकण्यासाठी त्यांनी जलधनुष्य हाती उचललं आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना साकडं घातलं. पैठणच्या जायकवाडी धरणातुन सिंधफणा नदीत जवळपास 70 कि.मी. जलद गती प्रवाह कालवा काढणे याशिवाय मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, मणार या धरणात उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळविणे. एवढेच नव्हे तर बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपुर, कंधार, रेणापुर, चाकुर, बिलोली, मुखेड आदी तालुक्यात या प्रयोगातुन सिंचन योजना राबवता येतील. जवळपास 6700 कोटी रूपये खर्च अपेक्षित असुन्ा दुष्काळाच्या पार्श्र्वभुमीवर एवढंच नव्हे तर मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी या प्रकल्पाचे तातडीने सर्वेक्षण करून काम हाती घेण्याची मागणी त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांची भेटही त्यांनी घेतली. खरं तर अत्यंत प्रभावी योजनेचा भगिरथ प्रयत्न हा पंकजाताईचा आहे. राजकारण बाजुला सोडलं तर कुठल्या काळात कुणाचा जन्म होईल?आणि मानव जातीच्या पिढ्यानपिढ्या कल्याणाच्या योजना कुणाच्या डोक्यात येतील?याची कल्पना कुणी करू शकत नाही. एका महिला नेतृत्वाने अतिशय महत्वाकांक्षी हाती घेतलेला हा प्रकल्प आहे. पंकजाताई केवळ काम हातात घेतात असे नव्हे. घेतलेलं काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यातच आहे हे बीड जिल्ह्यातील जनतेने रेल्वे प्रश्नावरून ओळखुन सोडलं आहे. एका अहिल्यादेवीने कितीतरी मंदिराचा जीर्णोद्धार केले. मात्र त्यासाठी अहिल्यादेवीला जन्म घ्यावाच लागला. तसंच काही असु शकतं. मराठवाड्यातल्या पाण्याचं दुर्भिक्ष आणि दारिद्रय कायमचं हाटविण्यासाठी कदाचित कै.शंकरराव चव्हाणानंतर पंकजाताईचा जन्म राजकारणात व्हावा लागला असं म्हटलं तर चुकीचं नाही. एकदा जर गोदावरीच्या पोटातलं पाणी मांजरेच्या पोटात येवुन पडलं तर खऱ्या अर्थाने साऱ्या पाण्याचा लाभ बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या लातुर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्याला निश्चित होवु शकतो. राजकारण करायचं तर चिरकाल टिकणारं आणि योजना आणायच्या तर पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या जनहिताच्या हाती घेतल्या पाहिजेत. अशा मताचं हे नेतृत्व आहे. त्यांनी जेव्हा योजनेची कल्पना पुढे आणली आणि प्रत्यक्ष शासकिय पातळीवर कामाला सुरूवात केली तेव्हा मराठवाड्यातल्या जुन्या जाणत्या लोकांनी या योजनेचं कौतुक केलं.अलीकडच्या काळात मराठवाड्याच्या प्रश्नावर आवाज उठवायला कुणी राहिलं नाही. अशी उणिव कै.विलासराव देशमुख, कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्यानंतर वाटत होती. मात्र पंकजाताई या नेतृत्वानं एक पाऊल पुढे टाकत मराठवाड्याच्या प्रश्नावर घातलेलं हे लक्ष खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आर्थिक सुबत्ता सुजलाम सुफलाम आणण्याचा भगिरथ प्रयत्न निश्चित आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश येवु दे एवढीच प्रार्थना.