बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार
राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजनेचे उदघाटन
श्रावण सोहळ्यातही होणार सहभागी
परळी दि. २३:आठवडा विशेष टीम―राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी (ता.२४) शहरात महिलांविषयक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. महिला बालविकास विभागाच्या वतीने ‘ महिला मेळावा’, राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजनेचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार असून शहरातील सखींच्या श्रावण सोहळ्यातही त्या सहभागी होणार आहेत. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया देखील या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.३० वा. वैद्यनाथ प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रज्वला योजनेचे उदघाटन ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयोगाच्या सदस्या उमाताई खापरे, मिनाक्षी पाटील, गयाताई कराड उपस्थित राहणार आहेत. शासनाने महिलांसाठी सुरू केलेली प्रज्वला योजना तसेच विविध शासकीय योजनांची माहिती, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वा. अक्षता मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत महिला मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनीचा सत्कार, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनींना गणवेश वाटप, बालविवाह रोखणा-या समाजसेवकांचा गौरव, जनजागृती करणा-या पत्रकारांचा सन्मान, माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आदी कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, शोभा दरेकर, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, चंद्रशेखर केकाण आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ४.३० वा. नटराज रंगमंदिर येथे परळी शहरातील सखींसाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रावण सोहळ्यातही पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डाॅ प्रितमताई मुंडे सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात महिलांनी एकत्रित येऊन उखाणे, मेहंदी, नृत्य, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांना महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डाॅ. शालिनी कराड यांनी केले आहे.