राज्यात पोषण आहाराची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल महिला बालविकास विभागाला राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई दि. २४:आठवडा विशेष टीम― राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अभ्यासू व कुशल नेतृत्वाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. राज्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या पोषण आहार अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार-२०१८-१९’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव रविंद्र पनवार, अतिरीक्त सचिव अजय तिर्के उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात, महाराष्ट्राला एकूण पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
क्षमता संवर्धनात महाराष्ट्र देशात दुसरा
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै २०१८ पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अमंलबजावणीच्या आधारे ‘क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन , एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आयुक्त इंद्रा मालो आणि उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी पुरस्कार स्वीकारला. ५० लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उस्मानाबाद राज्यात प्रथम
पोषण अभियानाच्या अंमलबजावणीत उस्मानाबाद जिल्हयाने निश्चित उदिष्टये पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्हयातील सर्व अंगणवाडयांमध्ये समुदाय विकास आधारीत कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी झाली आहे. क्षमता बांधणी व विकासांतर्गत जिल्हयातील सर्व २०१५ अंगणवाडयांमध्ये ३ लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासोबतच पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, कुपोषण मुक्ती बालग्राम विकास केंद्र आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.