महाजनादेश यात्रेचे बीड जिल्हयाच्या वेशीवर जोरदार स्वागत
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले ना पंकजाताई मुंडे यांचे जाहीर कौतुक
बीड दि. २६:आठवडा विशेष टीम― विरोधी पक्षाच्या यात्रा बकवास आहेत, सत्ता असताना तुम्हाला जनतेसाठी काही करता आलं नाही, आता कसल्या यात्रा काढता? अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. काॅग्रेसमुक्त महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी तयार रहा असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या महाजनादेश यात्रेच आज दुपारी बीड जिल्हयात आगमन झाले. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी धामणगाव ता. आष्टी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पहार घालून व लोकनेते मुंडे साहेबांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. कडा येथे यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली, भाजपच्या कार्यकर्त्यानी रस्त्यात ठिक ठिकाणी यात्रेचे जोरदार स्वागत केले.
आष्टी येथे झालेल्या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, बीडची माणसं गरीब असली तरी त्यांचे मन मोठं आहे. लोकनेते मुंडे साहेबांवर त्यांनी अतोनात प्रेम केले त्यामुळेच भाजपला भरभरून यश मिळाले आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. मुंडे साहेबांच्या पश्चात मी रडणार नाही, लढणार अशी शपथ घेतली होती, त्यादृष्टीने मी जनतेच्या भल्यासाठी काम करत आहे, त्यांचे नांव त्यामुळेच आज अजरामर झाले आहे. मी याठिकाणी मागण्यासाठी नाही तर काही करण्यासाठी आले आहे. बीड जिल्हयाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाॅटरग्रीड प्रकल्प मंजूर केला असून त्यासाठी चार हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आष्टीला सुध्दा पाणी देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि ते मिळणारच यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आज सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास या धोरणानुसार गरीबांसाठी काम करत आहे, ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे मुस्लिम बांधवांनी देखील स्वागत केले आहे. सामान्यांसाठी काम केल्यामुळे जनतेने पुन्हा त्यांच्या हातात सत्ता दिली असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीवर हल्ला
यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काॅग्रेस मुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही पाळला आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याचे आम्ही ठरवले आहे, सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादीला बीड जिल्हयातूनच काय पण महाराष्ट्रातूनही हद्दपार करू. विरोधी पक्षाचे नेते आज वेगवेगळ्या यात्रा काढून जनतेची दिशाभूल करत आहेत, सत्ता असताना तुम्हाला कांही करता आले नाही, आता कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाऊन आमच्यावर टीका करत आहात. त्यावेळी काही केले असते तर जनतेने तुम्हाला लाथाडले नसते अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी केले पंकजाताईंचे कौतुक
राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ना. पंकजाताई मुंडे यांचे जाहीर कौतुक केले. जी कामे आतापर्यंत कधीच झाली नव्हती ती आज पुर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाच वर्षात ३० हजार किमी चे रस्ते पुर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, त्यातील २२ हजार किमीचे रस्ते पुर्ण झाले असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत, देशातील कुठल्याही राज्याने हे केले नाही असे ते म्हणाले.