कर्मात शुद्धता राहिली तर फलश्रुती नक्कीच मिळते-डॉ.सुरेंद्र आलुरकर
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व राष्ट्रप्रेमाचे संस्कार शिक्षकांनी दिले पाहिजे तसेच कोणत्याही राष्ट्राला यशोशिखरावर नेण्याचे काम हे एक शिक्षकच करू शकतो. प्रत्येक शिक्षक हा चाणक्य आहे असे प्रतिपादन स्वा.रा.ती. विद्यापीठ नांदेडचे प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.ते भाशिप्र संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसर्या दिवशी प्रमुख उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर हे होते. तर व्यासपीठावर डॉ.बा.आं.मराठवाडा विद्यापीठचे व्यवस्थापन परिषदेचे संचालक डॉ.वाल्मीक सरवदे, मुख्यवक्ता डॉ.एच.पट्टाभीरामा सोमय्याजी, डॉ.बा.आं.म.विद्यापीठ मराठी प्रमुख तथा मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक देशमाने,स्था.व्य. मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.बिभीषण फड, प्रा.सुभाष पटेकर,प्रा. डॉ.देवीदास खोडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी मराठी,वाणिज्य व इंग्रजी या तीन विषयांवरील शोधप्रबंध व ग्रंथांचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.बिसेन पुढे म्हणाले की,खोलेश्वर महाविद्यालयाने माझ्यावर संस्कार केले व माझी जडण-घडण येथील शिक्षकांनीच केली.मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.अशा प्रकारच्या चर्चासत्रांच्या माध्यमातून विषयासंबंधी चिंतन, चर्चा व विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे व त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले पाहिजे, अभ्यासक्रम बदल होत असताना त्या अभ्यासक्रमांची उपयोगीता आजच्या वर्तमान काळात किती आहे.हे पाहिले पाहिजे दर्जेदार विद्यार्थी तयार होण्यासाठी दर्जेदार शिक्षक असायला हवेत शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान भांडार वापरून विद्यार्थ्यांना सांस्कारीत केले पाहिजे व विद्यार्थ्यांमधील वर्तमान, भूत व भविष्यकाळातील जाणीवा जागृत केल्या पाहिजेत असे झाले तरच अशा चर्चासत्रांचे फलीत झाले असे होईल विद्यार्थी हा केंद्रबिंदु माणून शिक्षकाने सतत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यरत असले पाहिजे आगामी काळात विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत व व्यावसायाभीमुख शिक्षण दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले की, संस्थेचे माजी विद्यार्थी प्रा.बिसेन हे नांदेड विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन करून निवडीबद्दल विशेष अभिमान असल्याचे सांगितले. कालच्या चर्चासत्रात तीनशे हून अधिक प्राध्यापक,संशोधक सहभागी झाल्याची माहिती देवून हे चर्चासत्र यशस्वी झाल्याचे सांगत चर्चासत्रातील सर्वच विषय वर्तमानाला स्पर्श करणार असल्याचे व भविष्याचा वेध घेणारे होते असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेंद्र अालुरकर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची एखादे काम करण्याची विशिष्ठ अशी पद्धत असते तीच त्याची ओळख ब्रँड बनत असते.बदलत्या काळात आजच्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना घडविण्याची खुप मोठी जबाबदारी आहे. शिक्षकांच्या स्वतःवर विश्वास हवा काम करण्यात शुद्धता राहिली तर फुलश्रुती नक्कीच मिळते.या प्रसंगी स्व.नाना पालकरांच्या स्मृतींना जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संस्थेच्या सर्वच संस्कार केंद्रांमध्ये त्यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबविले गेले याचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नितीन केंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.बालासाहेब मुंडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी,डॉ.बी.व्ही.मुंडे, प्रा.सुभाष पटेकर,प्रा. नितीन केंद्रे,प्रा.रोहिणी अंकुश,डॉ.उमा आसरडोहकर आदींनी परिश्रम घेतले.