बीड, १ जुलै (प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील शाळांची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘शाळा आहे की मृत्यूचा सापळा?’ असा संतप्त सवाल केला आहे. गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून, त्यांची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील शाळांची भयावह स्थिती
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २४७४ शाळा आहेत, ज्यात २४१५ प्राथमिक तर ५९ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंती कुजलेल्या, दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे या धोकादायक वर्गखोल्या कोसळण्याची भीती असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंगालीपिंपळा शाळेची दयनीय अवस्था: ३०० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथील जिल्हा परिषद शाळा मृत्यूच्या दारात उभी आहे. सन १९५१ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. या आठ वर्गखोल्यांमध्ये जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांची अवस्था पाहता, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसात त्या कधीही कोसळू शकतात. वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळते, भिंतींना मोठे तडे गेले आहेत आणि काही भिंतींचा प्लास्टर निघून पडत आहे. यामुळे वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचाही जीव धोक्यात आला आहे.
ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी
जीर्ण झालेल्या शाळेच्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार शिक्षण विभागाला केली आहे. मात्र, शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना, प्रशासनाचे हे दुर्लक्ष भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारे ठरू शकते. आमदार विजयसिंह पंडित यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन धोकादायक शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी योग्य पाऊले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.