बीड, ४ जुलै (प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळल्याने बीड जिल्ह्यातील शाळांच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र दिवसा वर्ग भरलेला असताना भिंत कोसळली असती तर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते. या घटनेनंतर तिसरीचा वर्ग शाळेच्या प्रांगणात झाडाखाली भरवण्यात येत आहे.
वैद्यकिन्ही शाळेतील आठपैकी सहा वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती सरपंच अतुल मकाळ यांनी यापूर्वीच शिक्षण विभागाला कळवली होती. असे असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. बीड तालुक्यातील कोटुळे वस्ती येथे आजही जिल्हा परिषदेची शाळा झाडाखाली भरत असल्याचे विदारक चित्र आहे.

या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अजितदादा, शाळा, अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय यापेक्षा तुम्हाला विमानतळ महत्त्वाचे वाटते का? पुढारी आणि कार्यकर्ते पोसण्यासाठी हे सुरू आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

डॉ. ढवळे यांनी बीड जिल्ह्यातील मूलभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना सुरक्षित इमारती नाहीत, मोडकळीस आलेल्या धोकादायक वर्गखोल्यांमध्ये त्यांना शिकावे लागत आहे. दुसरीकडे अंगणवाड्या झाडाखाली, समाज मंदिरात किंवा पत्र्याच्या शेडमध्ये भरतात. निधीअभावी इमारत नसलेल्या अंगणवाड्यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करा, असा अध्यादेश काढण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बीड जिल्हा रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांची माता व बालसंगोपनाची इमारत निधीअभावी धूळ खात पडली असून रुग्णांना चटईवर झोपावे लागत आहे. मोड्युलर शस्त्रक्रियागृह आदींसाठी निधी नाही, मात्र आवश्यक विकासकामांपेक्षा अजितदादांना विमानतळाची चिंता आहे, अशी टीका डॉ. ढवळे यांनी केली. जिल्हा नियोजन विभागाचा ५७५ कोटी रुपयांचा जिल्हा विकासाचा निधी दिला नाही. जिल्ह्याला शाळा, अंगणवाडी इमारत या महत्त्वाच्या नव्हत्या का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी पालकमंत्र्यांना आवाहन केले आहे की, “अजितदादा, आपण पालकमंत्री आहात. बीडची बारामती करू नका, पण ग्रामीण भागातील शाळेसाठी मूलभूत सुविधा द्या. विमानतळापेक्षा या चिमुरड्यांवर दया करा.”
या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळा इमारतींचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.