अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

भाशिप्र ही राष्ट्रहित जपणारी संस्था- डॉ.हरिदास विधाते

खोलेश्‍वर महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा शानदार समारोप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ‘भाशिप्र ही राष्ट्रहित जपणारी संस्था असून या संस्थेत सातत्याने समाजाभिमुख उपक्रम होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाचे संस्कार रूजविण्याचे काम येथे अविरतपणे केले जाते' असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले.ते खोलेश्‍वर महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर भाशिप्र संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर,स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.विधाते म्हणाले की,विविध भाषांचा,साहित्यांचा अभ्यास अशा प्रकारांच्या परिषदांच्या माध्यमातून होतो. प्राध्यापकांचे संशोधन , लेखन हे दर्जेदार असावे त्यामुळे प्राध्यापक हा चिंतनशील बनतो. परिषदांच्या माध्यमातून समाजहित डोळ्यासमोर ठेवून मंथन व्हावे अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ.सौ. कल्पनाताई चौसाळकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की,भाशिप्र संस्था ही नाविण्याचा पुरस्कार करणारी संस्था असून भूतकाळाचे भान ठेवून,वर्तमानाचा हात धरून भविष्याचा वेध घेणारी संस्था आहे. रामभाऊ कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाले की, प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रेरणा मिळावी तसेच गुणवत्तेत वाढ व्हावी आणि शैक्षणिक उदासीनता कमी व्हावी म्हणुन अशा प्रकारे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षीय समारोप करताना बिपिनदादा क्षीरसागर म्हणाले की, चर्चासत्रांच्या माध्यमातून शिक्षणाचे तसेच ज्ञानाचे योग्य उपायोजन व्हावे,यामुळे समाजहित व देशहित साधले जाते. नितीमुल्यांचे व संयमाचे शिक्षण मिळावे ही गांधीजींच्या शिक्षण विषयक दृष्टीकोणातून व्यक्त होते असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.प्रल्हाद तावरे यांनी कले आभार प्रदर्शन इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख प्रा.बिभीषण फड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, विद्यार्थी,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.