सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची अचानक बदली झाल्याने ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलन काळात पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याविना आहे.दरम्यान जिल्हा बदलीतून नवीन आलेले गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेला रुजू होवून आठवडा झाला परंतु अद्याप सोयगावचा पदभार घेतलेला नाही.त्यामुळे या बदली प्रकरणांचा गोंधळ अद्याप मिटलेला नाही.
जिल्ह्यात वर्ग-१ सर्जा प्राप्त असलेल्या सोयगाव पंचायत समितीला तब्बल नऊ वर्षापासून प्रभारी गटविकास अधिकारी लाभलेला आहे.या नऊ वर्षाच्या कालखंडात केवळ २०१६ ते १७ या वर्षात डॉ.लता गायकवाड या कायमस्वरूपी गटविकास अधिकारी एकदाच लाभल्या होत्या,त्यानंतर सोयगाव पंचायत समितीचा कारभार प्रभारींवरच सुरु आहे.सात महिन्याच्या कालावधीत सातव्यांदा मिळालेल्या प्रभारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची अचानक जिल्हा परिषद प्रशासनाने बदली केल्याने नवीन आलेले गटविकास अधिकारी अद्यापही सोयगावला हजर झालेले नाही.त्यामुळे ग्रामसेवकांच्या संप काळात पुन्हा नागरिकांच्या कामांना ब्रेक लागले आहे.गटविकास अधिकारी नसल्याने दलित वस्ती प्रस्ताव,घरकुल योजना धनादेश,वैयक्तिक शौचालये,आदी कामे प्रलंबित असल्याने गटविकास अधिकारीच नसल्याने लाभार्थ्यांना सोयगाव पंचायत समितीला चकरा माराव्या लागत आहे.याकडे जिल्हा परिषदेच्या पंचायत प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे.पंचायत प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी या समस्येवर लक्ष देण्याची आग्रही मागणी सोयगावातून होत आहे.
सात महिन्यात सातवा प्रभारी अन त्याचीहि बदली-
दरम्यान सात महिन्यात सोयगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी ज्योती कवडदेवी यांना नुकताच दोनमहिन्यापूर्वी प्रभारी म्हणून पदभार देण्यात आला होता,परंतु ऐन ग्रामसेवकांच्या संप काळात त्यांचीही बदली करण्यात आल्याने सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याविना आहे.