बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

पंकजाताई मुंडे यांनी मुस्लिम महिलांमध्ये जागवला आत्मविश्वास ; अल्पसंख्याक महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राबविणार विशेष मोहिम

महेबुबिया शिक्षण संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे थाटात वितरण

परळी दि.०९:आठवडा विशेष टीम―महिलांना कमी लेखण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही, त्यामुळे ही मानसिकता आता बदलली गेली पाहिजे, त्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा मी प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक समाजातील महिलांनी देखील पुढे यावे, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष योजना राबविणार आहे, त्यामुळे महिलांनो पुढे या, तुमचाही विकास मला साध्य करायचाय असे आवाहन करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास जागवला.

महेबुबिया शिक्षण संस्था व अंजूमन शिक्षण संस्थेच्या वतीने मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शेख अब्दुल करीम, वहाजुद्दीन मुल्ला, खालेद राज, बाबू नंबरदार आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बहादूर भाई व सचिव शेख खाजा शेख मेहताब यांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे यावेळी जोरदार स्वागत केले.

यावेळी बोलतांना ना पंकजाताई मुंडे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. महिलांना ताकद मिळाली नाही तर देश पुढे जाणार नाही, त्यामुळे त्यांना ताकद देण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा नारा देण्याबरोबरच बेटी को आगे बढाओ चा नारा आम्ही दिला आहे, त्यादृष्टीने आम्ही पाऊले उचलत आहोत. अल्पसंख्याक समाजातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष काम मी करत आहे, त्यासाठी योजना आणली आहे. या समाजातील मुला- मुलींना चांगले शिक्षण मिळावे, ते उच्च पदांवर बसावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल करायचा आहे. सब का साथ सबका विकास याबरोबरच सब का विश्वास आम्ही जिंकला आहे असे त्या म्हणाल्या.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर ; वेळीच सावध व्हा
  हिंदू-मुस्लिम असा भेद कांही स्वार्थी राजकारणी लोकांनी केला व अजूनही तसा प्रयत्न त्यांचा चालू आहे. या लोकांनी केवळ मतांसाठी तुमचा वापर केला. विकासापासून मात्र तुम्हाला दूर ठेवले. हे लोक खरे धोकादायक आहेत, त्यांना वेळीच ओळखा व अशा स्वार्थी मंडळी पासून सावध व्हा असे सांगत योग्य वेळ आली आहे, चांगले काम करणा-या व्यक्तीच्या बाजूने उभे राहण्याची, त्यामुळे यावेळी चुकीने का होईना एक वेळ चांगला निर्णय घ्या असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

  याप्रसंगी राजेश देशमुख यांनी ना. पंकजाताई मुंडे हया शब्द पाळणा-या नेत्या आहेत, चांगल्या वाईटाची पारख करा, चांगले काम करणा-याच्या मागे उभे रहा, त्यांचे नेतृत्व जपले तरच शहराचे भले होणार आहे असे आपल्या भाषणात म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहादूर भाई यांनी केले. कार्यक्रमास शहरातील मुस्लिम बांधव तसेच उर्दू माध्यमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.