सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―बैलगाडीवरून शेतातून घरी परतत असतांना धरणाच्या बाजूच्या पाण्यातील रस्त्यावरून शेतकऱ्याचा अंदाज चुकल्याने बैलगाडीसह शेतकरी पाण्यात बुडाल्याची खळबळजनक घटना बहुलखेडा ता.सोयगाव शिवारात सायंकाळी उशिरा घडली.दरम्यान या घटनेत धरणात बैल बुडून दगावला असून शेतकरीही पाण्यात बुडाल्याने गंभीर झाला आहे.ग्रामस्थांनी बैलजोडीसह शेतकऱ्याला रात्री उशिरा पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
शेतातून कोळपणी करून घरी परतत असतांना शेतकरी मोरसिंग मणदूर राठोड हा धरणाच्या बाजूला असलेल्या पाण्याखाली आलेल्या रस्त्यावरून बैलगाडी हाकत असतांना,त्याचा पाण्यातून रस्त्याचा अंदाज चुकल्याने बैलगाडीसह शेतकरी धरणाच्या पाण्यात बुडाला,परंतु शेतकरी मोरसिंग मणदूर राठोड याच्या हि घटना लक्षात येताच त्याने पाण्यात डुबक्या घेत बैलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता अंधारात मोरसिंग राठोड खोल पाण्यात बुडाल्याचे धरणाच्या बाजूला असलेल्या कामरोद्दिन तडवी याच्या लाखात हा प्रकार येताच त्याने गावात दूरध्वनीवरून संपर्क साधून ग्रामस्थांना घटनास्थळी पाचारण केले,या घटनेत धरण भागात आत्माराम पवार,मंगेश पाटील,मनोज राठोड,राजमल राठोड,स्वरूपसिंग राठोड,विष्णू राठोड,दादा राठोड आदींनी धरणाच्या पाण्यात उड्या घेवून बैलगाडीचा शोध मोहीम हाती घेतली असता,मृत झालेल्या बैल व बैलगाडी आणि शेतकरी मोरसिंग राठोड यांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने धाव घेतलेली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांनाच अंधारात टोर्च लावून तासभर शोधमोहीम घ्यावी लागली.
धरण रस्त्याचा प्रश्न प्रलंबित-
बहुलखेडा ता.सोयगाव येथे लघुपाट बंधारे सिंचन विभागाचे धरण आहे.या धरणात ओव्हरफ्लो पाणी होवून शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता पाण्यात बुडाला असून पंधरा दिवसापासून या भागातील धरणापलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यात बुडालेला रस्ता बाहेर काढण्यासाठी संबंधित विभागाला निवेदने दिली आहे.या प्रकरणी आठवडाभरापूर्वी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित विभागाला पाण्यात बुडालेला रस्ता बाहेर काढण्याच्या सूचना दिलेल्या असतांना लघुपाट बंधारे सिंचन विभागाकडून याबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बैलाचा मृत्यू….शेतकरी गंभीर
दरम्यान सायंकाळी झालेल्या घटनेत धरणात बुडून बैलजोडीसह बैलाचा मृत्यू झाला असून शेतकरी मोरसिंग मणदूर राठोड हा गंभीर झाला आहे.बैलाला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना रात्री उशिरा यश आले होते,परंतु घटनास्थळी प्रशासन अद्यापही आलेले नव्हते त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
घटनेचा पंचनामा सोमवारी
ग्रामस्थांच्या सांगण्यावरून बहुलखेडा ता.सोयगाव येथील धरणाच्या पाण्यात बैलजोडी बुडाल्याच्या घटनेचा पंचनामा सोमवारी करणार असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत लघुपाट बंधारे सिंचन विभागाच्या उपअभियंता शेख साजेद यांचेशी संपर्क होवू शकला नाही.