राष्ट्रवादीला भविष्य नाही, त्यांच्या मागे जाऊन मत वाया घालवू नका
हाळम येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे थाटात लोकार्पण; ११ कोटी ७६ लाख रूपयांच्या कामाचे भूमिपूजन
परळी:आठवडा विशेष टीम―गेल्या पांच वर्षात मंत्री म्हणून काम करत असताना भरभरून विकास निधी देण्याबरोबरच विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली, भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे, त्यामुळे ज्या पक्षाला भविष्य नाही, ज्यांचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला? असा सवाल करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.
हाळम येथे ६४ लाख रुपये खर्च करून पुर्ण झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजना, तीन सभागृहाचे लोकार्पण तसेच ११ कोटी ७६ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे, पशूवैद्यकीय दवाखाना तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास ह.भ.प. प्रभाकर झोलकर महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, दिनकरराव मुंडे, गयाताई कराड, रमेश कराड, बिभीषण फड, सतीश मुंडे, डाॅ. शालिनी कराड, परमेश्वर फड आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मंत्री म्हणून काम करत असताना मी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय तळमळीने काम केले. केवळ रस्ते, नाल्या, इमारती बांधून थांबले नाही तर माणसं जोडण्याचे काम केले. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांची चळवळ गतीमान करून महिलांना सशक्त केले. एवढे केल्यावर तुम्ही मलाच साथ देणार असा मला विश्वास आहे. जनतेला गुण्या गोविंदाने राहू देणारा लोक प्रतिनिधी आज हवा आहे. भाजपचेच सरकार पुन्हा येणार आहे, यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. पण ज्या राष्ट्रवादीचा जिल्हयात आमदार नाही, मराठवाड्यात एकही खासदार नाही, राज्यात सत्ता नाही, त्या पक्षाच्या मागे जाताच कशाला? त्यांचे उमेदवार पडणारे आहेत, उगीच मत वाया घालवू नका, काॅग्रेसचेही अवस्था तीच आहे. तुमच्या लेकीच्या पाठिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे तुमची सेवा करतांना कुठेही कमी पडणार नाही असे त्या म्हणाल्या.
महिलांना सक्षम केले
बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी या निधी बरोबरच कालच दुभत्या व गाभण गाई वाटप करण्यात आले आहे . यातून लाभार्थी प्रत्येक महिलेस दैनंदिन गाई पासून १५ ते २० लिटर दूध मिळू शकते या दुधाचा विक्रीचा व्यवसायातून खर्च वजा जाता त्यांना २० हजार रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळेल. गावातील महिला आणि कुटुंब या लक्ष्मी मुळे आनंदात राहतील. महिला बचत गटांसाठी यासह विविध योजना राबविल्या आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळून वैद्यकीय उपचारांसाठी उपयोग होणार आहे राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील व्यक्तींना दिले जाणारी मदत ही वाढ करून दुप्पट केली आहे असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचलन विनायक गुट्टे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.