● पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सेवा सप्ताह’ ; ९०० लाभार्थ्यांना कौटूंबिक शिधा पत्रिकांचे थाटात वितरण
परळी:आठवडा विशेष टीम― केंद्र व राज्य सरकारने आखलेल्या विविध योजना सर्व सामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही केले आहे, भविष्यातही माझा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठीच असेल असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून ८ ते १७ सप्टेंबर दरम्यान परळी शहरात साजरा करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने काल नटराज रंगमंदिरात बचतगटांच्या महिलांना गायी वाटप करण्यात आल्यानंतर आज अक्षता मंगल कार्यालयात कौटूंबिक शिधा पत्रिका ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, विकासराव डूबे, नगरसेवक पवन मुंडे, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार वाघमारे यावेळी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गोरगरिबांना व्हावा, यासाठी लाभार्थ्यांच्या दारापर्यंत सेवा देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. काल गायी वाटप पासून याची सुरवात आम्ही केली. गोर गरीबांना शिधा पत्रिका मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, त्यासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत होत्या, त्यांचा हा त्रास लक्षात घेवून त्यांना घरपोंच शिधा पत्रिका दिल्या. याशिवाय आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप करून पांच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा असो की उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत गॅस वाटप असो, हया योजनांचा लाभ आम्ही मिळवून दिला. संजय गांधी निराधार योजनेतंर्गत लाभार्थ्यांना दुपटीने मानधन वाढवले. हे सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठीच असेल, त्यामुळे चांगले काम करणा-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, आपले भविष्य उज्वल केल्याशिवाय राहणार नाही असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
यावेळी राजेश देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी विविध घटकांतील पांच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा पत्रिका देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचलन अॅड. अरूण पाठक यांनी केले. यावेळी शहरातील पुरूष व महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.