बीड:आठवडा विशेष टीम― बीड विधानसभा मतदार संघातील गावांना व वाड्या वस्त्यांना जोडणार्या रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत,रस्त्याचे डांबरीकरण व्हावे ही जनतेची अनेक वर्षापासुनची मागणी होती. मागील 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे मंत्रीमंडळात ग्रामविकास खाते आल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करून बीड विधानसभा मतदार संघातील रस्त्यांना ना.पंकजाताई मुंडे यांच्यामुळेच मुख्यमंत्री ग्रामसडक योेजनेतुन 315 कोटी रू.निधी मंजुर झाला आहे हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे फुकटचे श्रेय लाटण्याचा केवीलवाना उद्योग क्षीरसागर-मेटे यांनी करू नये असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात जयदत्तजी क्षीरसागर हे अनेक वर्ष मंत्री होते. तर शिवसंग्रामचे तथाकथित राष्ट्रीय नेते हे देखील विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होते व सत्तेत सक्रिय सहभागी होते. त्यावेळी राष्ट्रवादीची हक्काची त्यांची सत्ता असतांना बीड विधानसभा मतदार संघाकरिता कोणी काय दिवे लावले …?कोणी आपला आमदार फंड इतर जिल्ह्यात खर्च केला…? हे जगजाहीर आहे. बीड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम महाराष्ट्राच्या लोकप्रिय ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे या सतत विकासाचे राजकारण करतात. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रस्त्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन करोडो रूपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. बीड विधानसभा मतदार संघातही ना.पंकजाताई मुंडे यांनी पुर्वगृह दुषित राजकारण न करता ग्रामिण रस्त्यासाठी 315 कोटी रू.चा निधी मंजुर केलेला असुन, त्याची कामे दर्जेदार सुरू आहेत.
तसेच तिर्थक्षेत्र विकास,पर्यटन,जलयुक्त शिवार योजना,रेल्वे विकास,ग्रामविकास विभाग 2515 योजना ,केंद्रीय रस्ते विकास निधी,जिल्हा नियोजन समिती,पाणीपुरवठा योजना,आरोग्य विषयक योजना,कृषी विकास विषयक योजना,महिलांचे सक्षमीकरण, जि.प.शाळा दुरूस्ती, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, वाॅटर ग्रीड, दुष्काळ निवारण उपाय योजना या वेगवेगळ्या योजनेतून बीड विधानसभा मतदार संघातील गावांना हजारो कोटी रू.चा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
बीड नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असतांनाही विकासात दुजाभाव न करता बीड शहरातील नागरीकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत योजना, रस्ते विकास, भुमिगत गटार योजना, जिल्हा नियोजन निधी, दलित वस्ती विकास योजना,जिल्हा रूग्णालय दर्जावाढ, जि.प.इमारत,पंचायत समिती इमारत बांधकाम, शासकीय कार्यालयांचे बळकटीकरण या विविध योजनेंच्या माध्यमातून जवळपास 600 कोटी रू.चा निधी उपलब्ध करून देण्याचे सकारात्मक कार्य पालकमंत्री या नात्याने ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेले आहे. परंतु कधीही कोणत्याही कामांचे श्रेय घेण्यासाठी केवीलवाणी धडपड कधीही ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेली नाही. तसेच बीड विधानसभा मतदार संधात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रूपयांचे विकास कामे मंजुर करूनही कधीही उद्धघाटनाच्या माध्यमातून श्रेयवाद निर्माण केला नाही.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे शासन असल्यामुळे व या शासनामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या सक्षम कन्या ना.पंकजाताई मुंडे या महत्वपुर्ण भुमिकेत असल्यामुळेच मुंडे साहेबांचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्याला व बीड विधानसभा मतदार संघाला हजारो कोटी रूपयांचा निधी उलब्ध झालेला आहे हे न समजण्या ईतपत बीड विधानसभेतील जनता दुधखुळी नाही.त्यामुळे ना.पंकजाताई मुंडे यांनी मंजुर केलेल्या विकास कामांचे घाई-घाईत उद्घाटन करून श्रेय घेण्याचा केवीलवाना उद्योग क्षीरसागर-मेटे यांनी करू नये असा सडेतोड इशारा रमेश पोकळे यांनी दिला आहे.