बीड: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग शोध अभियानाचा धायगुडा पिंपळा येथे शुभारंभ

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त कुष्ठरोग शोध अभियानाचा प्रारंभ तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे शुक्रवार,दि. 13 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

जिल्ह्यात शुक्रवार पासुन कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात झाली आहे.राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिनांक 13 ते 28 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे.अंबाजोगाई तालुक्यात धायगुडा पिंपळा येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.हे अभियान राबविण्यासाठी 214 पथकांची तालुक्यात निर्मिती करण्यात आली आहे.प्रत्येक पथकात एक पर्यवेक्षक,आरोग्य सेवक,आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका,आरोग्य सहायीका व सहाय्यक हे घरोघर जावून कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी व सर्वेक्षण करणार आहेत.
पिंपळा धायगुडा येथे अभियानाचे उद्घाटन करताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,निदान न झालेले कुष्ठरूग्ण शोधून त्यांना तात्काळ औषध उपचाराखाली आणून नविन कुष्ठरोग शोधणे व विविध औषधोपचारांद्वारे या संसर्गाचे साखळी खंडीत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.या सोबतच कुष्ठरोगा विषयी जनजागृती करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे अभियान महत्वपुर्ण ठरणार आहे.तेंव्हा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य पथाकाला आपल्या आजाराबाबत योग्य माहिती द्यावी माहिती लपवू नये, या बरोबरच 30 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांची शारिरीक तपासणी करून उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,गर्भाशयाचे, तोंडाचे आदींसह 25 विविध आजारांबाबतचे सर्वेक्षण या अभियानाद्वारे होत आहे.बीड जिल्ह्यातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे राज्य सरकारतर्फे पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार केले जातील यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुधारणार असल्याचे राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.
पिंपळा धायगुडा येथे कुष्ठरोग शोध अभियानाचा प्रारंभ करतेवेळी धायगुडा पिंपळा गावचे सरपंच वसंतराव गोरे,उपसरपंच अमिर पटेल,पंजाबराव धायगुडे,ताहेर पटेल, विकास देशमुख,जावेद पटेल,विनोद सोमवंशी, अशोक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.मुंडे,डॉ.मेंढके, खाजा पटेल आदींसह इतरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक कापसे यांनी करून उपस्थितांचे आभार शिक्षक उमाप यांनी मानले.

बीड जिल्ह्यात प्रभावीपणे अभियान राबविणार-राजेसाहेब देशमुख

“कुष्ठरूग्ण शोध अभियानाला शुक्रवार पासुन प्रारंभ झाला असून हे सर्वेक्षण करण्यासाठी एक पुरूष व एक महिला असलेले 1865 जणांचे पथक या प्रत्येक पथकामागे एक पर्यवेक्षक असे 369 पर्यवेक्षक जिल्ह्यात काम पाहत आहेत. ग्रामीण भागात 100 टक्के तर शहरात 30 टक्के सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागासमोर आहे.या बाबत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी अशी मोठी यंत्रणा काम करीत आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यात कुष्ठरूग्ण शोध अभियान प्रभावीपणे राबवित आहोत.नागरिकांनी सहकार्य करावे.”


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.