मुंबई:आठवडा विशेष टीम―भगवान भक्तीगडावर होणा-या दसरा मेळाव्याकरिता राज्यातील समस्त भाविक भक्तांच्या वतीने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांना निमंत्रण देण्यात आले आहे, त्यामुळे यंदाचा मेळावा तितकाच जोरदार होणार आहे.
दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी
राज्यातील महत्वाच्या व्यक्तींची व भगवान भक्तांची बैठक आज राॅयलस्टोन निवासस्थानी पार पडली. या नेत्यांनी ना. पंकजाताई मुंडे यांच्यासमवेत चर्चा करून समस्त भाविकांच्या वतीने मेळाव्याचे निमंत्रण त्यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेत दसरा मेळाव्याचे नियोजन ठरविण्यात आले. पुढील चार दिवसांच्या कालावधीत भगवान भक्तीगडावरील मेळाव्यासंदर्भात ठिक ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन माहिती देणे तसेच विभागातील प्रमुखांनी दौरे करून जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. या मेळाव्याला कुठलेही राजकीय स्वरूप नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच भगवान भक्तीगडावर राज्याच्या काना कोप-यातून तसेच बाहेरील राज्यातून येणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेवून तसे नियोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय झाला. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सीमोल्लंघन ही परंपरा महत्वाची आहे आणि ती भव्यच असली पाहिजे असे पंकजाताई यांनी आवाहन केले.