पुरामुळे चार दिवसांपासून पाचोऱ्याचा संपर्क तुटला ,दोघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

पाचोरा:आठवडा विशेष टीम―
पाचोरा तालुका आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा ते जळगाव ,जामनेर तसेच पाचोरा ते नाशिक ,मुंबई राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विस्कळीत झालीआहे. पाचोरा तालुक्यात आतापर्यंत १०८ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला असून शहरातील कृष्णापुरी भागातील जितेंद्र महाजन वय २५ परिवहन महामंडळाचे बस चालक सतीश श्रीराम पाटील,वय ५२ यांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.जितेंद्र महाजन हा युवक दि.१८ रोजी कृष्णापुरी भागातील नदीपात्रात वाहून गेल्यानंतर त्याचा मृतदेह दि.१९ रोजी स्मशानभूमीजवळ सापडला होता. तर सतिश पाटील हे दि.२० रोजी पंचाळेश्वर मंदिर जवळील फरशी वरून मोटार सायकल वरून येतांना वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दि.२१ रोजी सापडून आला. प्रशासनाकडून वाहून गेलेल्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने शर्तीचे प्रयत्न केले होते. दरम्यान स्मशानभूमी जवळील वीट भट्टी भागात प्रशासनाच्या बचाव पथकास वडगाव टेक येथे अन्य एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
अति पावसामुळे जळगाव व नाशिक येथून येणारा भाजीपाल्याचाही पाचोरा शहरात तुटवडा निर्माण झाला असून भाजीपाल्याचे भाव कडाडले तर पाचोरा शहरातून शिवाजी चौकामार्ग कृष्णापुरी भागातून अरुंद असलेल्या पुलावरून फक्त दुचाकी व चारचाकी खाजगी वाहने वापरत असुन ट्रक,एसटी महामंडळाची बस गाड्यांचा दोन्ही बाजूने जागी उभे असून एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील सुमारे तीन वर्षापासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या पाचोरा तालुक्यात यंदा पावसाच्या सरासरीने शंभरी ओलांडली आहे.गतवर्षी १५ सप्टेंबर ला पावसाची वार्षिक सरासरी केवळ ६१.१ टक्के होती मात्र यावर्षी दि.२१ सप्टेंबरलाच पावसाची सरासरी १०८ टक्क्यावर पोहचली आहे.तालुक्यात सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या समाधानकारक पावसाने नदी,नाले, तलाव,धरणे तुडुंब भरुन ओसंडून वाहत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या सुरुवातीला येणाऱ्या व नगदी पिक समजल्या जाणाऱ्या पिकांना मात्र या अतिपावसाचा फटका बसला आहे.परिसरातील सर्व धरणे भरल्यामुळे शेतकरी बांधवांना येणाऱ्या रब्बी हंगामा कडून चांगल्या उत्पन्नाची आशा लागली असतांना अतिपावसाने बाधित कापूस व मका पिकां च्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.