शिवाजी चौकातून निघणार भव्य रॅली तर टाॅवरला होणार विराट सभा
परळी:आठवडा विशेष टीम―परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा – शिवसेना – रिपाइं – रासप – रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे हया आपला उमेदवारी अर्ज उद्या गुरुवारी (ता.०३) भव्य शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. शहरातुन भव्य रॅली काढून राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात सभा होणार आहे. यावेळी मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
ना. पंकजाताई मुंडे उद्या गुरुवारी सकाळी ११.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण भव्य रॅली काढण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली एकमिनार चौक, स्टेशन रोड, मार्केट कमिटी, मोंढा, टाॅवर, गणेशपार, नांदुरवेस, नेहरू चौक (तळ) मार्गे राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे. यावेळी महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
ऐतिहासिक विजयाची नांदी ठरणाऱ्या ना. पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि विराट सभेसाठी मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा – शिवसेना – रिपाइं – रासप – रयत क्रांती सेना महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.