आजच्या वर्तमान सुखासाठी तिने तिच्या भविष्यचं काय केलं ? ;बीड जिल्ह्यातील १३००० महिलांची गर्भाशय काढले.!

पाटोदा:दत्ता हुले―तुम्हाला माहीत आहे का या जगण्याला सगळ्यात मोठा शाप कोणता आहे…? तर या प्रश्नाचं खर उत्तर “गरीबी “आहे..हो आजकालच्या जगण्यात गरीबी हाच खूप मोठा शाप आहे.हे जग चालत फक्त पैशाच्या जोरावर आहे.ऊसतोड मजूर आणि कारखानदार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण या नाण्याची एक बाजू कारखानदार ही आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे, तर दुसरी बाजू ऊसतोड मजूर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, या नाण्याच्या दोनी बाजू आर्थिकदृष्ट्या एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत.
माझ्या आईला नेहमीच पोटदुखीचा त्रास व्हायचा, तरीपण शेतामध्ये काम करताना सर्व मन लावून व शरीराला झोकून देऊन काम करावे लागायचे, ऊसतोडायला कारखान्यावर गेल्यावर तिचा पहाटे चार ते रात्री दहा असा नेहमीच दिनक्रम चालू असायचा, पण याचं कामाचा त्रास झाला व ऊसाची मोळी घेऊन चढ उतारावर चालताना अचानक पोटामध्ये कळ यायची म्हणून नेहमीच खूप त्रास होत असायचा.
मला आठवते २०१४ चे वर्षे असेल त्या वर्षामध्ये आमच्या पाटोदा तालुक्यातील खेड्यातील महिलांचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याकडे कल वाढत होता,तो असा की पाटोद्यापासून जामखेड हाकेच्या अंतरावर (२०-२२ कि.मी.) आहे,नातेवाईक जवळच आहेत म्हणून जामखेडमध्ये सर्रासपणे खाजगी रुग्णालयात गर्भाशय काढायचे(महिलांची प्रजननासाठी पिशवी) प्रकार चालू होते.
माझ्या स्वतःच्या गावातून १०-१५ दिवसाला दोन-तीन महिला सोबत जात असायच्या कारण त्यांच्या जेवणाची व सोबत राहायची सोया व्हायची म्हणून, आणि पिशवी काढल्यानंतर महिलांना मासिक पाळी येत नाही व मासिक पाळी असल्यास महिलांना सामाजिक कार्यात, देवळात व देव्हाऱ्याजवळ प्रवेश नसातो,त्या काळात घरच्यांची जेवणाची खूप तारांबळ होते,शिळ्या भाकरी खाऊन चार दिवस काढायची वेळ विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ऊसतोड कामगार महिला व ग्रामीण भागातील अन्य महिलांवर येते ही वस्तुस्थिती होती,पण जेव्हा या महिलांना काही वर्षांनंतर पोटदुखीचा त्रास उदभवला तेव्हा हे सर्व चित्र समोर आलं आणि आज तागायत बीड जिल्ह्यातील १३००० हजार महिलांनी आपल्याला होणाऱ्या त्रासामुळे गर्भाशय काढल्याचे समोर आले आहे. याच सर्व गोष्टींचा आढावा या संक्षिप्त माहितीच्या आधारे देत आहे.
– (पाटोदा तालुक्यातील मजूर पुत्र)
मराठवाड्यातील दुष्काळी भागात दुष्काळ ज्या प्रमाणात असेल तेवढ्या कमीअधिक प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. मुळात ठिकठिकाणच्या ऊसशेतीमधील ऊस तोडून तो कारखान्यात गाळण्यासाठी व साखर बनवण्यासाठी नेऊन दिला जातो तो कारखान्याच्या ठेकेदारांमार्फत. हे ठेकेदार गावागावत जाऊन ऊसतोड कामगार गोळा करतात व त्यांना उचल देऊन पुऱ्या हंगामात काम करून घेण्यासाठी बांधून ठेवतात. हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. नवरा- बायकोचे मिळून कामगार म्हणून एक युनिट ठरवले जाते. एका जोडप्याला एक टन ऊस तोडण्याचे अडीचशे रुपये मिळतात. दोघांकडून चार-पाच महिन्यांत साधारणपणे तीनशे टन ऊस तोडला जातो. त्या जोडप्याची वार्षिक कमाई आणि उत्पन्न ऊसतोडणीच्या हंगामात जी काही असेल तीच असते. त्यामुळे त्यांना सुट्टी घेणे परवडत नाही.
स्त्रीची मासिक पाळी महिन्यातून साधारणपणे एक वेळा येत असल्याने तशा महिला महिन्यातून साधारण दोन ते तीन दिवस तरी काम करू शकत नाहीत. मासिक पाळीमध्ये महिलांची गैरसोय अतिशय होते. ती कुटुंबे ऊसतोडणीच्या ठिकाणी पाले ठोकून अथवा कोपटात राहत असतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. शिवाय रोजगार तर बुडतो आणि वरून दंडही भरावा लागतो. त्यामुळे अनेक महिला त्यांची ऑपरेशन करून घेऊन गर्भाशये काढून टाकतात.बीड जिल्ह्यातील काही गावात पन्नास टक्के महिलांनी गर्भाशये काढल्याचे आढळून आले आहे. अकाली गर्भाशय काढून टाकले तर त्याची भयानक किंमत त्या गरीब महिलांना चुकवावी लागते. हार्मोनल असंतुलन, मानसिक त्रास, डिप्रेशन, हातापायांची आग होणे, वजनात वाढ/घट, लठ्ठपणा असे अनेक त्रास उद्भवतात. महिला सांगतात, की “त्या व्यतिरिक्त महिलांचे लैंगिक शोषणसुद्धा होते”.
मुकादम म्हणतात की आम्ही मासिक पाळी आलेल्या महिलांना रुजू करून घेत नाही. गर्भाशय काढण्याचा निर्णय हा त्यांचा असून आम्ही त्यांना तसे करण्यास भाग पाडत नाही. पण दुसरीकडे, ठेकेदाराने गर्भाशय काढण्याच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन, ते नंतर मजुरीतून वसूल केल्याचेसुद्धा आढळून आले आहे. मराठवाड्यातील खाजगी दवाखानेदेखील गर्भाशयाच्या किरकोळ दुखण्यासाठी गर्भाशय काढण्याचा सल्ला देतात. ती स्थिती फक्त बीड जिल्ह्याची नाही. जो खुद्द नगर जिल्ह्यात पारनेर, पाथर्डी हे तालुके रखरखीत आहेत. तेथे पाणी नाही व त्यामुळे मजुरांची संख्या बरीच आहे. ऊसशेतीच्या भागात हे ऊसतोडीवाले कामगार पाले (पाचटाची झोपडी) ठोकून राहतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. उसतोडीवाल्यांना पहाटे चार-पाचला शेतावर तोडणीसाठी हजर राहवे लागते. समजा, जर सकाळी पोट साफ झाले नाही तर त्या स्त्रीचे त्या दिवशी काय हाल होत असतील त्याची कल्पना करा.
एखाद्या वस्तीवर जर लग्न असेल तर ऊसतोड कामगार जोडपे हातातील ऊसतोडणीचे काम सोडून त्या लग्नाला अक्षरशः पळत जातात. कारण त्यांना तेथे गोडधोड खाण्यास मिळते. त्यांना रोजचे हजार-दोन हजार रुपये मिळतात, तरी त्यांना ते खर्च करता येत नाहीत. कारण त्यांना त्या गंगाजळीवर पुढील वर्ष काढायचे असते. मी हा संघर्ष वृत्तांत व समाज माध्यमात मांडल्यावर अनेक जण भाष्य करतात. ज्यांनी ऊसतोड मजुरांच्या बायकांची स्थिती सांगितली.“ऊसाची शेती करून आणि ऊसाचे कारखाने काढून ज्यांनी अमाप कमावले अशा लोकांना मजुरांशी देणेघेणे काही नाही. बीडमध्ये तर ‘महिलाराज’ चालते..! म्हणजे बीडमधील राजकीय सत्ता आणि सूत्रे महिलांच्या (मुंडे भगिनी) हाती आहेत. तरीही त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. त्या विषयाला समाजातही गंभीर अशी वाचा फुटलेली नाही. नगर जिल्ह्यातील राजकारण ऊसावर कसे तापवले जाते ते तर सर्वश्रुत आहे! पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तेथील विद्यमान नेत्यांनी विचार केलेला नाही”.
या सर्व प्रकारची माहिती शासन दरबारी पोहचल्यावर जिल्ह्यात सभापती निलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली गेली व बीड जिल्ह्यामध्ये २० ते २२ वर्षे वयाच्या अनेक महिलांचे गर्भाशय काढले आहे. ते काढून टाकण्याची गरज होती का, असा प्रश्न अद्याप कुणीही उपस्थित केलेला नाही. वैद्यकीय आस्थापना कायदा होईपर्यंत गर्भशय काढण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये खासगी आरोग्य सेवांची नफेखोरी पाहता त्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नियमावली तयार करावी, सामाजिक सुरक्षा कायदा २००८ अंतर्गत सर्व ऊसतोड कामगारांचे बोर्ड स्थापन करून त्यावर कामगारांची अधिकृत नोंदणी केली जावी, त्यांना सामाजिक सुरक्षा निश्चितपणे मिळतील यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी तसेच गाव पातळीवर रोजगार हमी योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
―संक्षिप्त संकलन
इंजि. हुले दत्ता बळीराम
ऊसतोड मजुराचा मुलगा (पाटोदा)