नेकनूर:आठवडा विशेष टीम― आठवडी बाजाराचे औचित्य साधून नेकनूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, जय्यत तयारी करूनही सभेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद राष्ट्रवादीची चिंता वाढविणारा आहे. भर बाजारात बाजारतळावर सभा असूनही या सभेला शंभरच्या आसपास लोक उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केज मतदार संघात भाजपाच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दोन्ही बाजूकडील प्रचाराने वेग पकडला आहे. कालावधी कमी असल्याने सर्वच उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी वेळेची कसरत करावी लागत आहे. रविवारी नेकनूरचा आठवडी बाजार असल्याने इथे प्रचंड गर्दी असते. ही संधी साधून नेकनूर येथील बाजारतळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली. मात्र, बाजारासाठी आलेल्या लोकांनी या सभेकडे चक्क पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे इनमिन शंभर लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला आपली सभा आटोपती घ्यावी लागली. सभेला असलेली तुरळक गर्दी चर्चेची ठरली असून या सभेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, साठेंच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आणि नगरसेवक बबनराव लोमटे हे प्रचंड मेहनत घेत असल्याने अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादीची वातावरण निर्मिती झाली आहे. मात्र, उर्वरित ग्रामीण भागात राष्ट्रवादीची अवस्था अद्यापही बिकट असल्याचे त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.