पंकजाताई मुंडे यांनी व्यापाऱ्यांना दिली सुरक्षेबरोबरच व्यापार, उद्योग वाढीची हमी
व्यापारी बांधवांशी साधला सुसंवाद
परळी:आठवडा विशेष टीम―इथल्या व्यापारपेठेची एक वेगळी ओळख आहे, परंतु काही लोकांमुळे आज व्यापारी सुरक्षित नाही, त्याचा परिणाम बाजारपेठे बरोबरच शहराच्या विकासावर होत आहे. परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वतःला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापा-यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच माझा अजेंडा आहे अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी स्थानिक व्यापा-यांना सुरक्षेबरोबरच व्यापार, उद्योग वाढीची हमी दिली.
ना. पंकजाताई मुंडे यांनी सोमवारी संध्याकाळी अक्षता मंगल कार्यालयात शहरातील व्यापारी बांधवांशी सुसंवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सर्व स्तरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी त्यांनी दिलेल्या हमीमुळे व्यापारी बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, इथला उद्योग व व्यापार वाढावा यासाठी अहमदनगर- बीड-परळी हा रेल्वेमार्ग पूर्ण होत आहे, त्याचे काम परळीपासून गतीने सुरू करण्यात आले आहे. परळी रेल्वे स्थानकाचा समावेश राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्यामुळे देशभरातील भाविक याठिकाणी येतील अशी सोय केली आहे. वॉटर ग्रीड च्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडयात पिण्याचे पाणी पुरवठा केले जाणार आहे. परळी वैद्यनाथ देवस्थान चा विकास करण्यासाठी १३३ कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने परळी हे देशाच्या नकाशावर आणता आले. या सर्व गोष्टी इथला व्यवसाय आणि उद्योग वाढण्यासाठी निश्चित उपयोगी ठरणार आहेत. व्यापार वाढला तर शहराचा विकासही चांगल्या प्रकारे होईल. व्यवसाय व व्यापार कसा करावा हे ग्राम विकास विभागाच्या बचत गटाच्या माध्यमातून मी जगाला दाखवून दिले. बचत गटाच्या महिलांनी अमेरिकेत जाऊन आपले उत्पादन विकून इतिहास रचला आहे.
भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त परळी हे ध्येय
परळी शहर हे सुसंस्कृत व संस्कारित करण्याचे लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न होते, त्यासाठीच त्यांनी मला राजकारणात आणले, त्यांचे हे स्वप्न मला पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद मला आवश्यक आहेत असे त्या म्हणाल्या. इथले वातावरण भय आणि भ्रष्टाचारमुक्त करून परळी शहराला स्मार्ट सिटी करणे हाच माझा अजेंडा आहे असे सांगून येत्या गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येत आहेत, त्यांचं येणं हे परळीचा नावलौकिक वाढविणार असून शहराच्या भाग्याची दिशा निश्चित करणार आहे, त्यामुळे नेत्याची नैतिक ताकद ओळखुन सोबत रहा, कुणाच्याही धमक्यांना न घाबरता मला आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, नंदकिशोर बियाणी, भिकूलाल भन्साळी, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, दत्ताप्पा इटके, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष विनोद सामत, शांतीलाल जैन, विकासराव डूबे, विजय वाकेकर, संदीप लाहोटी, राजाभैय्या पांडे, प्रा. विजय मुंडे, ओमप्रकाश सारडा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभूते, रिखबचंद कांकरिया, विष्णू देवशेटवार, गोल्डी भाटिया, माणिक कांदे, रतन कोठारी, सचिन दरक, श्रीकांत चांडक, निर्मळे, वैजनाथ कोल्हे आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.