महाराष्ट्र राज्यराजकारणसामाजिक

बचतगट आणि ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

आठवडा विशेष |प्रतिनिधी

मुंबई दि २३: बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आज बचतगट आणि ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आजपासून ४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहणार आहे. प्रदर्शनात देशभरातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

अॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या धरतीवर बचतगटांची उत्पादने आता ‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल अॅप तसेच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई - कॉमर्स व्यासपीठाचे आज अनावरण करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात या अॅपवर बचतगटांची ५० उत्पादने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला बचतगट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, ५० लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरु झालेली महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची चळवळ मागील वर्षी १० कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचली आहे. यावर्षीही या प्रदर्शनातून बचतगट मोठी आर्थिक उलाढाल करतील. या प्रदर्शनात दुष्काळी भागातील नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्या उत्पादनांची विक्री करुन त्या आपले कुटुंब सावरत आहेत. महिला बचतगटांच्या अशा लाखो यशोगाथा आहेत. महिलांनी बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला क्रांतिकारी अशी गती दिली आहे.

बचतगटांच्या उमेद अभियानात राज्यात पुर्वी फक्त ८ जिल्ह्यांचा समावेश होता. मागील चार वर्षात राज्यातील २६ जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये उमेद अभियानांतर्गत साडेतीन लाख बचतगट काम करीत आहेत. ४० लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली असून त्यापैकी ८ लाख कुटुंबांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या कुटुंबातील महिला आता लघुउद्योजिका बनल्या आहेत.

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादीत होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठीच्या अभियानाचाही आजच्या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला. राज्यात झालेल्या हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल.

पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी पथदर्शी प्रकल्पाचा आज प्रारंभ करण्यात आला. या दोन जिल्ह्यातील अनुभव लक्षात घेऊन लवकरच इतर ठिकाणी हा प्रकल्प सुरु करण्यात येईल.

अस्मिता फंडमधून बालगृहातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे ४ हजार मुलींना हे नॅपकिन्स दिले जातील. या मोहीमेचा शुभारंभही आज करण्यात आला. अस्मिता फंडमध्ये आतापर्यंत २२ लाख रुपये जमा झाले असून नागरीकांनी या निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.

कोकण आणि पुणे विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे बचतगट, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट बँक शाखा यांना यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह राज्याभरातील बचतगटांच्या महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.