ना.पंकजाताई मुंडे यांनी कुटूंबासह गोपीनाथ गडावर जाऊन घेतले दर्शन
परळी दि.२०:आठवडा विशेष टीम―आमच्या बहीण भावाच्या नात्यात जो तणाव आला आहे तो केवळ आणि केवळ धनंजय मुळेच आला आहे, त्यांनी ही निवडणूक इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नये असे भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले. गोपीनाथ गडावर जाऊन सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजाताई मुंडे यांना भोवळ आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या,त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी थेट गोपीनाथ गडावर जाऊन सहकुटुंब दर्शन घेतलं, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मला यासंदर्भात अधिक काही बोलायचे नाही. मात्र, निसर्ग या सगळ्याचा न्याय करेल. धनंजय यांनी जो प्रकार केला तो गलिच्छ आहे, निवडणूक मध्ये हार जित होत असते मात्र त्यासाठी अशा प्रकारे कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही,मी लोकांना सांगितलं आहे की मला काही नको,मी जशी आहे तशी ठीक आहे.
व्हायरल क्लीपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला, यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, धनंजय यांनी आता खोटे बोलू नये, या सगळ्या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर धनंजय यांनी ती क्लीप स्वत:च्या फेसबुक पेजवरून डिलीट केली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडे त्याचे पुरावे आहेत. दुसऱ्या भावाने आमच्या नात्यात विष कालवले, या धनंजय मुंडेंच्या दाव्याचेही पंकजांनी यावेळी खंडन केले. चूक झाल्यानंतर ती इतरांवर ढकलणे बरोबर नाही. किमान स्वत:च्या कृतीची जबाबदारी घ्या, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.