सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात दहा दिवसापासून सुरु असलेल्या दमदार पावसाने सोयगाव तालुक्यातील मका,कपाशी,ज्वारी,आणि सोयाबीन आदि पिकांचे काढणी पश्चात पावसाने नुकसान झाले असल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली आहे.याबाबत नुकसानीच्या सूचना बाबत फॉर्म भरण्यासाठी संबंधित कंपनीकडे ४८ तासात नुकसानीच्या तीव्रतेचे फॉर्म भरण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाकडून पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले यांनी केले आहे.
सोयगावसह तालुक्यात झालेल्या पावसाने काढणी पश्चात नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पाहणी करून नुकसानीची तीव्रता आणि आकडेवारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी शनिवारी कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आले आहे.दरम्यान सोयगाव तालुक्यात खरिपाच्या ४३ हजार हेक्टरपैकी तब्बल ४० हेक्टरवरील पिके पाण्याने कुजली असून यामध्ये मका,ज्वारी आणि कपाशी पिकांना झाडावरच कोंब आले आहे.या नुकसानीची शनिवारी तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले यांच्या पथकाने पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीचे सूचना फॉर्म भरून देण्याच्या सूचना केल्या आहे.संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीकडे तातडीने हे नुकसानीचे अर्ज जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ज्वारीला फुटले कोंब-
काढणी पश्चात मक्यापाठोपाठ ज्वारीला हि कोंब फुटल्याने ज्वारी व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे अति पावसात सोयगाव तालुक्यातील आठ हजार हेक्टर वरील मका,पाच हेक्टर वरील ज्वारी,चार हेक्टरवरील सोयाबीन,आणि २६ हजार हेक्टर वरील कपाशी पिके मातीमोल झाले असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालाला पाठविण्यात आला आहे.
मका मातीमोल-
कापणी करून शेतावर काढणी पश्चात ठेवलेल्या मका पिकांच्या रासला चक्क कोंब आल्याने या मक्याची माती झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.सोयगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांच्या नुकसानीची तीव्रता गंभीर झाली असून याबाबत पाहणी करण्याचे तातडीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशात नुकसानीच्या सूचनेचे अर्ज तातडीने भरून घेण्यात येवून संबंधित ठिकाणावर महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे पंचनामे करण्याचे नमूद करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आता दिवाळी नंतर पंचनामे होणार यात शंका नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून दिलासा मिळला आहे.
नुकसानभरपाईचे निकष-
काढणी पश्चात शेतात ठेवलेल्या पीकविमा भरलेल्या पिकांनाच नुकसान भरपाई देण्यात येन्मार असल्याने संरक्षित पिकांचेच पहिल्या टप्प्यात पंचनामे होणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान सुहाना अर्ज भरतांना पीकविमा भरलेली पावती नमूद करणे गरजेचे आहे.पहिल्या टप्प्यात संरक्षित पिकांचे पंचनामे करण्यात येणार असून त्यासाठी संरक्षित पिके मका,कापूस,सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचे नुकसानभरपाई मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.पीकविमा काढलेल्या बाधित पिकांसाठी नुकसानीच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात मिळणार असून यासाठी दोन हेक्टरची मर्यादा घालून देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पीकविमा न घेतलेल्या पिकांचे दुसऱ्या टप्प्यात पंचनामे करण्यात येणार असून या पिकांसाठी हेक्टरी सहा हजार आठशे प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पाहिल्या टप्प्यात नुकसानीच्या तीव्रतेची पाहणी करण्यात येत असून,शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित कंपनीकडे नुकसान सूचना अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.त्यासाठी पीकविमा काढलेली पावती जोडणे अनिवार्य आहे.त्यानंतर पीकविमा न भरलेल्या बाधित पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहे.
―सुदाम घुले
तालुका कृषी अधिकारी सोयगाव