बीड दि ०७ : जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, रमेश पोकळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण,तहसिलदार अविनाश शिंगटे,गोरख शिंदे,प्रकाश शिंदे, विनोद इंगोले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांनी महामंडळाचे उद्देश सांगून महामंडळाच्या कर्ज प्रकरणाबाबत बँकनिहाय आढावा घेऊन जी प्रकरणे प्रलंबित आहेत ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्या प्रकरणांना तात्काळ मंजूरी देण्याच्या सूचना त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सर्व बँकांना दिलेले उद्दीष्ट मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीन नियोजन करावे, असे सांगून दिव्यांग व्यक्तीसाठी महामंडळाच्या योजनेमध्ये ४ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून त्यांचीही कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, तसेच या प्रकरणाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी बोलतांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. या बैठकीस पदाधिकारी,अधिकारी, जिल्हयातील सर्व बँकेचे अधिकारी तसेच लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.