बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, बहुजन समाजाचे श्रद्धास्थान कर्मयोगी स्व. हणमंतराव तथा तात्यासाहेब साळुंखे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ मंगळवार दि. १९ नोव्हेम्बर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता हणमंतराव साळुंखे विद्यालयाच्या प्रांगणात कलेढोण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे माझी केंद्रीय गृहमंत्री मा.सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते तात्यासाहेब साळुंखे स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या समारंभात सातारा जिल्ह्यातील खासदार तसेच आमदार यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती हणमंतराव साळुंखे फाउंडेशनचे अध्यक्ष – संजीव हणमंतराव साळुंखे यांनी दिली.
तात्यासाहेबांच्या शैक्षणिक, सहकार, राजकीय अशा विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण, रचनात्मक कार्यामुळेच त्यांच्याविषयी बहुजन समाजातील सर्वच घटकांच्या मनात नितांत आदर व श्रद्धा असल्यानेच समाजभूषण तात्यासाहेब साळुंखे सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रयत्न व योगदानातून तात्यांची कर्मभूमी कलेढोण येथे तात्यासाहेबांच्या भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
तात्यासाहेबांनी आपल्या जीवनात बहुजनांचे कार्य करतांनाच उपेक्षित, बलुतेदारीत असलेल्या असंघटित नाभिक समाजाची संघटना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नेतृत्व स्वीकारले. समाजाला संघटित करण्याबरोबरच आपल्या तेजस्वी धारदार वक्तृत्वाने समाज जागृत करून बलुतेदारीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारून काम तेथे दाम हि भूमिका घेऊन समाजाला खऱ्या अर्थाने दिशा दिली.
नाभिक समाजाच्या उन्नतीचे ध्यास घेऊन स्व. हणमंतराव साळुंखे तात्यांनी आयुष्यभर कार्य उभारले. आज जो काही नाभिक समाज संघटित दिसत आहे त्याच प्रमाणे संघटित पणे संघर्ष करीत आहे त्याची खरी दीक्षा तात्यासाहेबांमुळेच मिळालेली आहे. हे तात्यासाहेबांच्या नाभिक समाजावर ऋण असल्याचे नाभिक समाज कदापिही विसरणार नाही. तात्यासाहेबांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून त्यांचे आचार, विचार व कार्याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. भगवानरावजी बिडवे यांनी तात्यासाहेब साळुंखे यांच्या विषयी माहिती देतांना आदरयुक्त विचार व्यक्त केले.
समाजभूषण हणमंतराव तथा तात्यासाहेब साळुंखे यांच्या स्मारकाचा अनावरण समारंभ मंगळवार दि. १९ नोव्हेम्बर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे तरी या समारंभास नाभिक समाजातील युवक, महिला, तसेच नाभिक समाज बांधवानी आदरणीय तात्यासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाभिक एकतेचे दर्शन घडवावे असेही अवाहन राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष मा. भगवानरावजी बिडवे यांनी केले.