सोयगाव,ता.१०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
अवकाळी पावसाच्या विश्रांतीचं पाचव्या दिवशी रविवारपासून सोयगाव तालुक्यात कापूस वेचनीच्या पहिल्या टप्प्यातील कामांनी वेग घेतला असतांना कापूस पिकांमध्ये कापूस बोंडवर नवीन कापूस पिकांचे झाड आढळून येत असल्याचा नवीन प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.त्यामुळे कापसाच्या झाडावर पुन्हा कापुसाचे झाड असे चित्र सोयगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.
सोयगाव तालुक्यात कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रावर तब्बल ३० हजार हेक्टरवर कापूस पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.दिवाळी सणानंतर सोयगाव तालुक्यात कापूस पिकांच्या पहिल्याच वेचणीला प्रारंभ करण्यात आला असता,कापसाच्या बोंडावर पुन्हा कापुसाचे नवीन झाड तयार झाल्याचे वेचणी मजुरांच्या लक्षात आले असून शेतकरी मात्र नुकसानीच्या खाईत लोटल्या गेल्या आहे.आधीच घरात कापुसाचे बोंडहि नाही त्यातच अवकाळी पावसाच्या तडाख्यात नुकसानीनंतर वाचेल्या कापसाची वेचणी हाती घेतली असता,कापसाच्या बोंडात नवीन झाड आढळून येत असल्याने मजुरांच्या सोबतच शेतकर्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात मका,सोयाबीन,ज्वारी,बाजरी,आदी पिकांसह कापूस पिकांचेही शंभर टक्के नुकसान झाले असतांना आणि सोयगाव तालुक्यात कापूस पिकांचे संरक्षित विमा उतरविल्याच्या शेतकरी संख्येत मोठी वाढ आहे.परंतु विमादावे अपलोड करण्यासाठी मात्र शेतकरी अद्यापही संभ्रमात असून संबंधित कंपन्याकडून विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी जाचक अट लावण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे.
शंभर टक्के नुकसानीनंतर जोखीमस्तर कमी-
सोयगाव तालुक्यात खरीपाचे प्रमुख पिके म्हणून कापूस पिकांची ओळख आहे.मराठवाड्यात कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात मात्र यंदाच्या हंगामात कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम दिसून येत आहे.पहिल्या वेचणी नंतर सोयगाव तालुक्यातील कापसाचा हंगाम पूर्णत्वास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.