पाटोदा:आठवडा विशेष टीम― मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ उभ्या ट्रकला बोलेरो धडकून झालेल्या भीषण अपघातात बोलेरो गाडीतील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान बालकाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. हे लोक दारू सोडविण्याचे औषध घेण्यासाठी बोलेरो गाडीतून (एमएच २३ एएस ३४७०) पाटोदा तालुक्यातील बेलखंडी येथे जात होते. मांजरसुंबा – पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रोडवर उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि बोलेरो गाडीतील सात जण जागीच ठार झाले. यात वैजिनाथ ज्ञानोबा तांदळे, केसरबाई बन्सी मुंडे, बाळू पंढरीनाथ मुंडे, अशोक मुंडे,आसराबाई भीमराव मुंडे व अन्य दोन हे जागीच ठार झाले आहेत. चालक मात्र या अपघातातून बचावला असून तो गंभीर जखमी आहे. नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात हलवले.