परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―परळी न्यायालयात तारखेला सतत गैरहजर राहणाऱ्या परळी येथील येथील शिवाकुमार महाजन याची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की परळी येथील सुंदराबाई दौंड यांनी शिवकुमार शंकराप्पा महाजन यांच्या विरुद्ध कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अन्वये फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात साक्षी पुरावा होऊन प्रकरण निकालाकरीता ठेवले असता आरोपी शिवकुमार महाजन हा फरार झाला. अनेक दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजाभाऊ शेळके व पोलीस नाईक माधव तोटेवाड यांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवा महाजन हा लपलेल्या ठिकाणी छापा मारून त्यास अटक केली. शिवकुमार महाजन यास परळी न्यायालयासमोर हजर केले असता परळी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करून त्याची तुरुंगात रवानगी केली. आरोपी सतत तारखेला गैरहजर रहात असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत .त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे व आरोपीची तुरुंगात रवानगी केल्यामुळे अनेक फरार आरोपींचे धाबे दणाणले आहे.फिर्यादीच्या वतीने अॅड.व्हि.एस.फड व अॅड उषा दौंड अॅड.प्रविण फड यांनी काम पाहिले.