घाटनांदूर:आठवडा विशेष टीम―मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचा लाल दिवा घाटनांदूर जिल्हा परिषद गटाला हुलकावणी देत आहे, परंतू, आज झालेल्या जिल्हा परिषद ओ.बी.सी. महीला आरक्षण सोडतीमुळे पुन्हा एकदा सौ.शिवकन्या शिवाजी सिरसाट यांच्या रूपाने घाटनांदूर जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषदेचा लाल दिवा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, तो जर मिळाला तर बीड जिल्ह्याच्या चळवळीमध्ये काम करणार्या घाटनांदूरच्या मातीचा आणि माणसाच्या शिरपेचात मानाचा तुरा नक्कीच शोभून दिसणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील अतिशय संवेदनशील अशा घाटनांदूर जिल्हा परिषद गटात घाटनांदूर गाव हे मिनी शहर म्हणून ओळखले जाते. या पूर्वीही दत्ताकाका जाधव यांचा जिल्हाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता, पण संख्याबळ तुल्य झाल्याने एका लहान मुलाच्या या पदाची सोडत काढण्यात आली आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे विजयराजे पंडित यांची चिठ्ठी निघाल्याने घाटनांदूर जि.प. गटाची घोर निराशा झाली होती. मागील वेळी सौ.शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचा जि.प. उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता, पण जि.प. भाजपाच्या ताब्यात गेल्याने त्याही वेळेस निराशाच झाली.
यावेळी मात्र आ.धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे शिवाजी सिरसाट तसेच बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागील 35 ते 40 वर्षांपासून बीड जिल्हा मजुर फेडरेशनच्या अध्यक्ष पदावर विराजमान असणारे बन्सीधरअण्णा सिरसाट यांचा बीड जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क असल्यामुळे यावेळी घाटनांदूर जि.प.गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष पदाचा सन्मान मिळेल अशी चर्चा घाटनांदूर जि.प.गटामध्ये सर्वसामान्यांत ऐकायला मिळत आहे.