सोयगाव,ता.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
अवकाळी पावसात शंभर टक्के ओव्हरफ्लो झालेल्या सोयगाव शहराजवळील पाझर तलावाला सोमवारी दुपारी अचानक भगदाड पडल्याने लाखो लिटर पाण्याची गळती सुरु झाली होती.आधीच अति पावसात शेतातील चिखल यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा या गळती झालेल्या पाण्याचा त्रास झाल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात आला,दरम्यान तालुका प्रशासन दूरच परंतु संबंधित विभागाच्या यंत्रणेने रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट न दिल्याने रात्रीतून तलाव रिकामा होण्याची शक्यता बळावली आहे.
जलसंधारण विभागाचा सोयगाव शहराजवळ पाझर तलाव आहे,या तलावाची नुकतीच संबंधित विभागाने दुरुस्ती केली असूनही अति पावसाच्या पाण्यात शंभर टक्के भरलेल्या या पाझर तलावाला मात्र पावसाच्या विश्रांती नंतर ,महिनाभराने गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान तलाव शंभर टक्के ओव्हरफ्लो असतांना या तलावातून दुपार पासून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झालेला आहे.या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत तालुका प्रशासनाच्या वतीने कोणतीही भेट न झाल्याने यावर अद्यापही उपाय योजना न झाल्याने रात्रभर पाण्याचा अपव्यय सुरूच होता.त्यामुळे ऐन टंचाई काळात कामात येणारा तलावातील पाण्याला गळती लागली आहे.