अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील कोळकानडी येथे स्व.प्रमोदजी महाजनसाहेब आधार व मदत केंद्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल बापु धिमधिमे हे समाजातील गरजू लोकांना मदत करीत आहेत. समाजातील निराधार,विधवा, परिक्त्यक्ता,महिलांना मदत व सहकार्य करून समाजासमोर चांगला पायंडा धिमधिमे यांनी पाडला आहे.त्यांच्या वतीने करण्यात येणार्या कामाच्या माहिती पत्रकाचे विमोचन प्रसंगी बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की,समाजातील तरूण पिढीने सुनिल धिमधिमे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवून समाजातील गरजू व्यक्तींना सहकार्य करावे असे आवाहन देशमुख यांनी केले.
शुक्रवार,दि.29 नोव्हेंबर रोजी स्व.प्रमोदजी महाजन साहेब आधार व मदत केंद्र यांच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे विमोचन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते व अंबाजोगाई येथील गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,बीड येथील प्रभारी शिक्षण अधिकारी प्रदिप राठोड,
बीड येथील विस्तार अधिकारी तुकाराम पवार,काशिनाथ आडे, ईश्वर शिंदे,उपसरपंच अरूण बनसोडे,बाळासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य शाहुराव पांचाळ यांच्या उपस्थितीत माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुनिल बापु धिमधिमे यांनी सांगितले की,समाजातील युवकांनी व्यसनांपासुन दुर रहावे,पर्यावरण संवर्धन करा, वृक्ष रोपांची लागवड करा, स्त्रियांना मातेसमान वागणुक द्या,मुलींचा जन्मदर वाढवा, मुलींना शिकवा,गरजवंतांना मदत करा,गरीब,अनाथ, भिकारी,दिव्यांग,बेवारस आणि वृध्द यांची सेवा करा असे ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षांपासुन सुनिल धिमधिमे हे गरजू महिला भगिनींना साडी,अन्नधान्य वाटप,कॅन्सरग्रस्त रूग्णांना औषधोपचारासाठी मदत यासाठी जनजागृती व समाज प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांच्या या कार्याचा आदर्श समाजाने पुढे चालवावा असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी या प्रसंगी केले.