अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

बीड: अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराला चाप ; स्पर्धात्मक निविदा मागवून गाळे वाटप करा

स्पर्धात्मक निविदा मागवून गाळे वाटप करा-पणन संचालकांचे आदेश

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील पश्‍चिम बाजूवर आसणार्‍या पोट भाडेकरूंना करार संपल्यानंतर पुन्हा गाळे भाड्याने देण्याचा ठराव क्रमांक.10 बाजार समितीने 4 जानेवारी 2019 रोजी घेतला होता.हा ठराव नगररचनाकार,बीड व पणन संचालक,पुणे यांची कुठलीही परवानगी न घेतल्याने हा ठराव रद्द करावा याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे यांनी पणन संचालक,पुणे यांचेकडे अपील दाखल केले.सदर अपीलामध्ये वेळोवेळी सुनावणी होवून शुक्रवारी याबाबत पणन संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांनी निकाल दिला.अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभाराला या निकालामुळे चाप बसला आहे. ठराव क्रमांक 10 चा पुनर्विचार करावा,गाळे भाड्याने देण्याची प्रक्रिया ही स्पर्धात्मक निविदा मागवून,जाहिरातीद्वारे पारदर्शक प्रक्रिया राबवून करण्यात यावी तसेच कृषी आधारित व कृषी पुरक उद्योग करणार्‍या उद्योजकांना सदर गाळे हे भाड्याने देण्यात यावेत असे आदेश पारित केले आहेत.

पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शुक्रवार,दि.28 नोव्हेंबर रोजी अर्जदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे यांच्या अपील क्रमांक 15/ 2019 या बाबत निकाल दिला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 52 बी अंतर्गत दाखल केलेले अपील हे बाजार समितीच्या संचालक मंडळाने 4 जानेवारी 2019 रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक.10 या बाबत आक्षेप घेतले.यात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली.26 सप्टेंबर 2019 रोजी यात अंतिम सुनावणी होवून सदर प्रकरणाचा निकाल शुक्रवार,दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पणन संचालकांनी आदेश पारित करुन दिला.या निकालाने अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभाराला चाप बसला आहे.या प्रकरणाची पार्श्‍वभुमी अशी की,अंबाजोगाई बाजार समिती यार्डात पश्‍चिम बाजूस 1981 साली मराठवाडा विकास महामंडळ यांना व 10 पोट भाडेकरूंना 30 वर्षांच्या लीजवर नाममात्र शुल्क आकारुन सदर 36 हजार चौरस फुट इतकी जागा दिली होती. सदरील जागेचा करार 12/10/2011 रोजी संपला. त्यानंतर महामंडळ व पोटभाडेकरू यांनी ही जागा रितसर पंचनामा करुन बाजार समितीस परत दिली.सदरील जागा ही भाडेपट्टयाने देताना नगररचनाकार,बीड व पणन संचालक,पुणे यांची परवानगी घेणे आवश्यक असताना अंबाजोगाई बाजार समितीने सदरील निर्देशांचे पालन न करता 4 जानेवारी 2019 रोजी ठराव क्रमांक.10 पारित करुन त्यानुसार सदरील जागा ही जुन्याच भाडेकरुना देण्याचा ठराव घेतला.हा ठराव चुकीचा व महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 याची पायमल्ली करणारा असल्याचे लक्षात येताच व कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता, कृषी आधारित व कृषी पुरक उद्योजकांना न देता या प्रकरणी बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाने मनमानी कारभार करुन नियम मोडल्याचे दिसून आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे यांनी याबाबत पणन संचालक,पुणे यांचेकडे अपील दाखल केले होते.त्यानुसार 28 नोव्हेंबर रोजी याबाबत निकाल देताना पणन संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांनी अर्जदार यांचे अपील क्रमांक 52/2019 अंशतः मंजुर करण्यात येत असल्याचे सांगितले.बाजार समितीने घेतलेल्या ठराव क्रमांक.10 बाबत पुनर्विचार करावा व औद्योगिक प्रयोजनासाठी त्यांचेकडील 36 हजार चौरस फुट जागेमधील 10 गाळे त्यांचे बाजार क्षेत्रातील 10 कृषी आधारित व कृषीपुरक उद्योक करणार्‍या उद्योजकांना भाडेपट्टयाने देण्याबाबत स्थानिक पातळीवर जाहिरातीद्वारे प्रसिद्धी देवून स्पर्धात्मक निविदा मागवून जास्तीत जास्त बोली लावणार्‍या बोलीदारांना भाडेपट्टयाने देण्याबाबत पारदर्शक प्रक्रिया राबवून निर्णय घ्यावा असे आदेश पारित केले आहेत.या निकालाने कृषीपुरक उद्योग करणार्‍या उद्योजकांना गाळे मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.व्यापारी वर्गाने या निकालाचे स्वागत केले असून आता उद्योजकांना खुल्या व पारदर्शक लिलाव पद्धतीने गाळे मिळणार आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.