अंबाजोगाई(प्रतिनिधी)दि.१८:आठवडा विशेष टीम―भाजपा नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे ह्या आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या असुन त्यांनी काल जिल्ह्यात येवुन निवडुंगवाडी ता.पाटोदा येथे अपघातात मयत झालेल्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. दोन लहान बालकांना एक लाख रूपायाची आर्थिक मदत देवुन ऱ्हदयातली सामाजिक संवेदना जपली. पंकजाताईच्या अंगी हे ममत्व आहे. राजकारणात यश-अपयश हे बाजुला ठेवा पण नेतृत्व समाजकल्याणासाठी कठोर परिश्रम घेत असेल तर तो आत्मभाव सामान्य लोकांची मने जिंकणारा ठरतो. त्या बीडात आल्या.जिल्हा परिषद निवडणुक पार्श्र्वभुमीवर महत्वाच्या बैठका घेतल्या. असंख्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुन्हा त्या सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांचे आत्मबल वाढलं असुन मोठ्या उत्साहाने भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसुन आले.
माजी मंत्री पंकजाताईच्या आत्मभाव भुमिकेचं नेहमीच सामान्य जनतेने स्वागत केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव म्हणजे राजकारण संपलं असं नव्हे. ज्या नेतृत्वाने बीड जिल्ह्यात विकासाची महाचळवळ उभा करून सकारात्मक राजकारणाचा पाया भरला. कोटी कोटी विकासाच्या योजना आणल्या. विकास काय असतो? हे त्यांनी दाखवुन दिलं. मुळात त्यांची भुमिका जवळुन पाहिलं तर समाजातील अठरापगड जातीधर्माच्या लोक कल्याणाची आहे. समाजात काम करण्यासाठी सत्ताच लागते असं नव्हे. पण सत्ता आल्यानंतर कसं काम करावं लागतं?याचं उदाहरण त्यांनी केवळ जिल्ह्याला नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राला दाखवुन दिलं. 32 लाख महिला बचत गटाशी जोडुन आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ उभा केली. तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादेत येवुन जाहिरपणे त्यांना शाब्बासकी दिली. त्यांच्या ऱ्हदयातला आत्मभाव हा खऱ्या अर्थाने वंचित, उपेक्षित, सोशित आणि पिडीत लोकांना न्याय मिळवुन देणारा आहे. ज्यांचा कुणी वाली नाही, त्यांचा आवाज पंकजा मुंडे.हे चित्र गेल्या दहा वर्षापासुन जनता पहात आहे. निवडुंगवाडी ता.पाटोदा येथील एकाच कुटुंबातील आठ जण ऊसतोड कामगार एका अपघातात ठार झाले. त्या कुटुंबियाची जातीने जावुन प्रत्यक्ष त्यांनी भेट घेतली. जगण्यासाठी आधार मिळालेल्या या कुटुंबियाला त्यांच्या लेकराला एक लाख रूपायाची आर्थिक मदत गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने दिली. हे ममत्व त्यांच्या अंगी आहे. याला पंकजाताई म्हणतात. एकीकडे आभाळ फाटलं अशा अवस्थेत पंकजाताईची खंबीर साथ जीवन जगण्यासाठी उमेद देणारी असं त्या कुटुंबियाबाबत पहायला मिळालं. खास मुंबईवरून त्या बीडात आल्या. कडवे समर्थक जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संतोष दादा हंगे यांना पितृशोक झाला. त्यांचीही भेट घेवुन कुटुंबियांचे सांत्वन केले. भाजप नेते राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी तब्बल चार तास बसुन त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधला. अनेकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवडणुक पार्श्र्वभुमीवर सदस्य आणि गटनेत्यांच्या सोबत संवाद साधला. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्याशी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुक पार्श्र्वभुमीवर चर्चा करून काही महत्वाच्या सुचनाही त्यांनी दिल्या. तात्पर्य हेच आहे की, पुन्हा त्या राजकारणात सक्रिय झाल्या असुन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीच्या नंतर एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा घेवुन त्या कामाला लागलेल्या दिसल्या. कार्यकर्त्यांचा उत्साहही त्यामुळे बळावल्याचे लक्षात आले.