बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमी

परळी एमआयडीसीसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश, धनंजय मुंडेंचे वचनपूर्तीकडे पहिले पाऊल!

नागपूर दि. २२:आठवडा विशेष टीम―परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळीत ( सिरसाळा ) पंचतारांकित एमआयडीसी उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे. परळीत एमआयडीसी उभारणी साठी आवश्यक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करावी असे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी यासंबंधी आग्रही मागणी केली होती.

आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात परळी मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते, त्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. काल दि. २१ डिसेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीनन्तर त्यांनी हा आदेश दिल्याचे समजते.

परळी शहराजवळील सिरसाळा भागात एमआयडीसी साठी जमीन राखीव आहे. विधानपरिषद सदस्य असताना धनंजय मुंडे यांनी २७ जून २०१७ ला याबाबत पहिली मागणी केली होती व ०८ जुलै २०१७ ला शासन स्तरावर पहिली बैठक होऊन याबाबत भुनिवड समितीने जमीन पाहणी करावी असा निर्णय झाला होता. नंतर नोव्हेम्बर २०१७ मध्ये या भूनिवड समितीने जागेची पाहणी देखील केली होती. या एमआयडीसी साठी एकूण १०१.६६ हेक्टर आर क्षेत्र अधिग्रहित करण्याचे याअगोदरच जून २०१८ मध्ये उच्चाधिकार समितीने निश्चित केलेले आहे.

आ. मुंडे यांच्या मागणीनंतर शासनाने घेतलेल्या बैठकीत पुढील टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी शासकीय ९६.६५ हेक्टर आर जमीन तात्काळ संपादित करण्याचे आदेश देण्यात आले असून सिरसाळा भागातील गायरान जमीन असल्यामुळे जमीन संपादनाच्या प्रक्रियेस फार वेळ लागणार नाही.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अजून बाकी आहे, त्या विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांचेही नाव अग्रस्थानी असणार आहे. असे असतानाही मंत्रीमंडळ विस्तार किंवा पद यापेक्षा आपल्या मतदारसंघात दिलेले अश्वासन पूर्ण करण्यास धनंजय मुंडे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे परळीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.