आमदार प्रकाशदादा सोळंके, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे ही सोबत
मुंबई दि. ०८: आठवडा विशेष टीम― उद्या गुरुवार दि. ०९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे हे अहमदनगर व बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थ स्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. सकाळी ठीक ११.०० वा. ते हेलिकॉप्टरने बीड तालुक्यातील नारायणगड येथे दाखल होणार आहेत.
‘मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर या’ या महंत नामदेव शास्त्री यांच्या निमंत्रणानंतर ना. मुंडे हे मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मआराठवड्यात व महाराष्ट्रात भक्ती – शक्तीचा संगम म्हणून अत्यंत महत्व असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड, श्रीक्षेत्र भगवानगड व श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे दर्शनासाठी येत आहेत.
या दौ-यात त्यांच्या समवेत आमदार प्रकाशदादा सोळंके, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे हे ही सोबत राहणार आहेत.
सकाळी ११ वाजल्यापासून मुंबई येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून ना. मुंडे यांचे श्रीक्षेत्र नारायणगड येथे हेलिकॉप्टरने दुपारी १२.३० वा आगमन होईल तेथे संत नगद नारायण महाराज यांच्या दर्शनानंतर ना. मुंडे हे हेलिकॉप्टरने भगवानगडाकडे रवाना होतील.
भगवानगड येथे भक्ती शक्तिची जुनी परंपरा असल्याने व ना. मुंडे यांचा दोन्ही जिल्ह्यातील चाहता वर्ग पाहता येथील दर्शनाच्या भेटी दरम्यान ना. मुंडे व भगवानगड प्रेमींची मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.
भगवानगड येथून ना. धनंजय मुंडे हे दुपारी २.३० वा. मोटारीने टेम्भुर्णी – मानूर – टाकळी या मार्गाने पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगड कडे जाणार आहेत व ४.३०वा गहिनीनाथ गड येथे दर्शन घेऊन बीडकडे मोटारीने निघणार आहेत.
ना. धनंजय मुंडे हे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व ना. मुंडे यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे, तसेच भगवानगडासह सर्वच ठिकाणी ना. मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली असल्याचे समजते.