बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

ना.पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी बेंगलुरू एक्स्प्रेसचे घाटनांदूरला केले जंगी स्वागत

ग्रामस्थांनी कृतज्ञता सोहळ्यातून मानले मुंडे भगिनींचे आभार

मुंडे साहेबांच्या पुण्याईमुळेच जिल्हयाच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यात यश- ना.पंकजाताई मुंडे

आठवडा विशेष |प्रतिनिधी

घाटनांदूर दि. २५ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्हयाच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याचा एकेक शब्द मी योजनेत बदलला, त्यांच्या पुण्याईमुळेच आज जिल्हयाच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यात यश मिळाले आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.

नांदेड - बेंगलुरू एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांच्यामुळे पुर्ण झाली. आज मुंडे भगिनींनी घाटनांदूर रेल्वे स्थानकात सायंकाळी या रेल्वेचे हिरवा झेंडा दाखवून जंगी स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, रमेश आडसकर, ज्येष्ठ नेते वैजनाथ आप्पा गारठे, रिपाइं नेते महेंद्र निकाळजे, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, संजय गिराम, बिभीषण गिते आदींसह भाजपचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेलं विकासाचं प्रत्येक स्वप्न पुर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. एकट्या घाटनांदूरला माझ्या विभागाचा १४ कोटीचा निधी दिला, परिसरातील सर्व रस्ते, सभागृह, जलसंधारणाची कामे केली. मागील २५ वर्षात आला नसेल एवढा निधी दिला, आता पुढच्या २५ वर्षांचे नियोजन मला करायचे आहे. जिल्हयाला विकासाचे वैभव प्राप्त करून दिले, ही सर्व मुंडे साहेबांची पुण्याई आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या नांवाचे राजकारण करणारांच्या मागे जावू नका तर त्यांचे नांव जिवंत ठेवणारांच्या मागे खंबीरपणे उभा रहा.

जिल्हयाला डझनभर आमदार देणा-या राष्ट्रवादीने लोकांच्या प्रश्नांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले, त्यांनी केवळ थापा मारून राजकारण केले म्हणूनच मी वंचित पिडित घटकांसाठी काम करतेयं. बस्स झाले, बोगसगिरी आता चालणार नाही त्यामुळे जनतेनेही चपटी बोटीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या मागे उभे रहावे. मुंडे साहेबांनी मला प्रत्येक मैदानात लढण्याची ट्रेनिंग दिली आहे, मी शुन्यावर बाद होणारी खेळाडू नाही. तुमच्या विश्वासाच्या बळावर निवडणूकीचे मैदानही जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे

घाटनांदूर ग्रामस्थांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पुर्ण करू शकले याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही असेच काम करू. आज आम्ही केलेली कामे भावी पिढीलाही उपयोगी ठरतील त्यामुळे ना. पंकजाताई मुंडे यांना साथ द्या असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले. यावेळी गोविंदराव केंद्रे, रमेश आडसकर, आ. संगीता ठोंबरे यांची भाषणे झाली.

रेल्वे येताच ग्रामस्थांचा जल्लोष

बेंगलुरू एक्स्प्रेस सायंकाळी ६.३० वा. रेल्वे स्थानकात येताच ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले. यावेळी रेल्वेच्या चालकाचाही त्यांनी सत्कार केला. रेल्वेचे एडीएमआर सुब्रमण्यम व इतर अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. हजारो ग्रामस्थांनी रेल्वेचे आगमन होताच एकच जल्लोष केला. मुंडे भगिनींच्या कृतज्ञतेच्या घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.