ब्रेकिंग न्युजलेख

नामदार बच्चू कडूंना सेल्फी पाँईंट करू नका !

दत्तकुमार खंडागळे-

चार वेऴा अपक्ष आमदार म्हणून निवडूण आलेले आणि नुकतेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री झालेले बच्चू कडू हे खर्या अर्थाने लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या मातीत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभलेले काही मोजके नेते आहेत. त्या मोजक्या नेत्यांपैकी बच्चू कडू हे एक आहेत. आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. ते जिथे जातील तिथे लोकांची झुंबड उडते आहे. त्यांच्या आजूबाजूला लोक अक्षरश: पिंगा घालत आहेत. ते राज्यात दौर्यावर असले काय आणि मंत्रालयात असले काय एकसारखीच स्थिती असते. त्यांच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी असते. त्यांच्याबद्दल लोकांच्यात प्रचंड प्रेम, आस्था, आत्मियता आणि कुतूहल आहे. त्यांना युट्युबवर ऐकणारा फार मोठा वर्ग आहे. यात तरूण आहेच पण वयोवृध्दही आहेत. समाजातल्या सर्व वयोगटात बच्चू कडू लोकप्रिय आहेत. त्यांच्या अवतीभोवती जमणारी गर्दी उस्फुर्त असते. या गर्दीचे एक वैशिष्ठ्य असे की यात बहूतांश सेल्फीसाठी गोऴा झालेले असतात. बहूतेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढायची असते. या सेल्फी बहाद्दरांच्या गराड्यातून बच्चू कडूंची सुटका होता होत नाही. त्यांच्या दौर्यातला आणि कामातला बहूतेक वेऴ सेल्फी काढणार्या लोकांच्या गराड्यात जातो अशी आजची स्थिती आहे. जणू बच्चू कडु हे सेल्फी पाँईट झाले आहेत. ते रस्त्यात मुत्र विसर्जनाला थांबले तरी लोक जावू देत नाहीत. लोक जवऴ येतात आणि सेल्फी काढत बसतात. ते जेवायला निघाले, बसले तरी सेल्फीवाला घोऴका आवरता आवरत नाही. तो सेल्फी काढतच राहतो. या सेल्फीवाल्या घोऴक्याची गर्दी पाहून बच्चू कडू 'सेल्फी पाँईट' होतात की काय ? अशी भिती वाटते.बच्चू कडूंच्याकडे अफाट कार्यक्षमता आहे. त्यांच्याकडे जो कामाचा उरक, झपाटा आणि प्रामाणिकपणा आहे तो क्वचित नेत्यांच्याकडे दिसून येतो. प्रहारच्या कार्यकर्त्यांनीही काही गोष्टींचे भान ठेवायला हवे. बच्चू कडूंचा जास्तीत जास्त वेऴ कामात कसा जाईल ? काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेऴ कसा मिऴेल ? याची काऴजी घ्यायला हवी. या माणसाला निट झोप मिऴत नाही. रोज प्रचंड प्रवास आणि जागरण करावे लागते. प्रवास करून करून त्यांचे पाय सुजलेले असतात. सततच्या जागरणाने डोऴे तारवटलेले असतात. सलग सतरा-सतरा तास काम करावे लागते. यातला बहूतेक वेऴ प्रवास, कार्यक्रम आणि फोटोत जातो. त्यात कार्यक्रमानंतर फक्त आणि फक्त फोटोसाठी खुपच वेऴ जातो. या सेल्फीच्या आणि फोटोच्या गर्दीत प्रहारचे कार्यकर्तेही मश्गूल असतात. परत परत त्यांच्याबरोबर फोटो काढताना दिसतात. दिवसातले कमीत कमी दोन तासतरी त्यांचे सेल्फी आणि फोटोत सहज वाया जातात. बच्चू कडूंचा प्रत्येक क्षण ना क्षण खुप मौल्यवान आहे. त्यांचा एक क्षणसुध्दा वाया जाणे लोकांना परवडणारे नाही. राज्यभरातले लोक त्यांच्याकडे समस्यांचा डोंगर घेवून येत आहेत. त्यांच्या मागे लोकांची झुंडच्या झुंड असते. ते रस्त्यावरून चालू लागले तीच अवस्था, ते मंत्रालयात फिरू लागले तिच अवस्था असते. बाकी इतर आमदार व मंत्री मोकऴेच फिरतात. त्यांच्या मागे फारसं कोणी दिसत नाही. पण या माणसाच्या मागची लोकांची गर्दी प्रचंड आहे. या माणसाकडून लोकांच्या अपेक्षाही खुप आहेत. सर्व सामान्य माणसाला सहज आणि एका फोनवर उपलब्ध होणारा, माघारी स्वत: फोन करून विचारपुस करणारा दुसरा कुणी नेता नाही. बहूतेक नेते कार्पोरेट झालेत. त्यामुऴे सामान्य माणसाने कुणाकडून अपेक्षा करायची ? अशा स्थितीत बच्चू कडू हे एकमेव आशा वाटणारे नेतृत्व आहे. त्यामुऴेच बच्चू कडूंचा एक एक मिनिट लाख मोलाचा आहे. तो वेऴ वाचवणे, फोटो व सेल्फीपेक्षा तो जन कल्याणाच्या कामाला लावणे गरजेचे आहे. याची काऴजी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनीच घ्यायला हवी. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी समांतर व्यवस्था तऴागाऴापर्यंत उभी करत पक्ष आणि संघटना वाढवत लोकांची कामे करायला हवीत. असा कर्तृत्ववान नेता लाभणे महत्वाचे असते. तो लाभला आहे तर त्या नेत्याची ताकद लोकांच्या हितासाठी वापरली पाहिजे. तो नेता व त्यांची संघटना अधिक बऴकट करायला हवी. असा माणूस राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असे स्वप्न पाहत ते लोकांच्या मनात पेरायला हवे. ते पेरलेले स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी अखंड काम करायला हवे. तर आणि तरच बच्चू कडूंच्या मंत्रीपदाचा उपयोग महाराष्ट्राला खुप होईल.