अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

प्रत्येक घडामोडीकडे सकारात्मक दृष्टीने पहा -राजेंद्र बहाळकर

"दृष्टीकोन" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मुलांमध्ये असलेला आत्मविश्‍वास जागृत करून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होणे गरजेचे आहे. जगातील प्रत्येक घडामोडीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे तरच आपल्यातील न्युनगंड कमी होईल असे प्रतिपादन अभ्यासक राजेंद्र बहाळकर यांनी व्यक्त केले. "दृष्टीकोन" या विषयावर आयोजित कार्यशाळेत 120 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तक्रार निवारण समितीच्या वतीने "दृष्टीकोन" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राजेंद्र बहाळकर,डॉ.शुभदा लोहिया, समन्वयक डॉ.अहिल्या बरूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेंद्र बहाळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने व सोप्या भाषेत आगळा वेगळा दृष्टीकोन कसा विकसित करायचा या विषयी माहिती देवून त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधला.मार्मीक उदाहरणातून इंग्रजी भाषे विषयीची भिती कशी दूर करता येईल या बाबत समर्पक शब्दांत माहिती दिली.उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी डॉ. शुभदा लोहिया यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मार्गदर्शनपर विचार मांडले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे यांनी मुलांना या कार्यशाळेच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोण विकसित करण्यासंदर्भात माहिती मिळाल्याचे नमुद करून या कार्यशाळेचे फलीत झाल्याचे डॉ.गुंडरे म्हणाल्या.या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य कांतराव काढे, उपप्राचार्य पी.के.जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक करताना समन्वयक डॉ.अहिल्या बरूरे यांनी नमुद केले की,मुलांचे भावविश्‍व व विचारविश्‍व व्यापक करण्याच्या दृष्टीने सदरील कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती बरूरे यांनी दिली.तर सुत्रसंचालन प्रा.पाटील यांनी करून उपस्थितांचे आभार डॉ.रोहीणी खंदारे यांनी मानले.