पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

राजकीय द्वेषातुन कार्यकर्त्यांवर हल्ले करणारांवर कठोर कारवाई करा―खा.डॉ.प्रितमताई मुंडे

बीड टू जामखेड कार्यकर्त्यांसाठी ताई पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून

बीड.दि.२५:आठवडा विशेष टीम―मागील काही दिवसांपासून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून आमच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक पाळत ठेवून हल्ले केले जात आहेत.राजकीय द्वेषाने प्रेरित संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.

राज्यातील सत्तेमधे बदल होताच काही विशिष्ट लोकांकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत.जाणीवपूर्वक पाळत ठेवून असे हल्ले होत असून अशा घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने अशा घटना योग्य नसल्याचे म्हणत कायदा व सुव्यवस्थेला आवाहन देणारे हल्लेखोर जर उजळ माथ्याने फिरत असतील तर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकते.पोलीस प्रशासनाने अशा लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.

खा.प्रितमताई मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिले.यावेळी त्यांच्या समवेत भाजपा नेते रमेश पोकळे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,सर्जेराव तांदळे,स्वप्नील गलधर,राणा डोईफोडे,सलीम जहांगीर,राजेंद्र बांगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड पोलीस ठाण्यात खा.प्रितमताई ठाण मांडून

नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यावर राजकीय द्वेषातुन हल्ला झाल्याची माहिती मिळताच खा.प्रितमताई मुंडे यांनी बीडहुन थेट जामखेडकडे धाव घेतली.हल्ला झालेल्या कार्यकर्त्याची पोलीस प्रशासन फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजल्याने त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होई पर्यंत ठाण मांडली.यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव धोंडे,सविता गोल्हार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.