अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसंपादकीयसामाजिक

महान भारतीय परंपरा आणि संस्कृती पाल्यांच्या मनावर रूजवा―सौ.पुजाताई कुलकर्णी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शालेय जीवनात मुला-मुलींच्या संगोपनाची जबाबदारी केवळ शिक्षकांचीच असते असे नव्हे तर आई-वडिलांनी नेहमीच सतर्क राहुन त्यांच्याशी मैत्रीच्या नात्यातुन संवाद साधला पाहिजे. दोन कुळांचा नांवलौकीक वाढविणारी कन्या त्या दृष्टीने संस्कारक्षम आणि सक्षम बनवणं हे आपलंच काम असतं. चंगळवाद हा खरा आता नव्या पिढीसाठी भस्मासुर असुन या महापुरात आपली लेकरं वाहत जावु नये याची काळजी घेणे महत्वाचे आहे.मोबाईल,टी.व्ही. चा अतिरेक न होता महान भारतीय परंपरा आणि संस्कृती पाल्यांच्या मनावर रूजवणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन योगेश्वरी देवल कमिटीच्या सदस्या सौ.पुजाताई कुलकर्णी यांनी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील खोलेश्वर प्राथमिक शाळेत हाळदी- कुंकवाच्या निमित्त आयोजित केलेल्या नाते मैत्रीचे या पालक संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सहशिक्षिका सौ.दराडे तर व्यासपीठावर सौ.तरकसे आणि सौ.कल्याणीताई जोशी यांची उपस्थिती होती.तब्बल अर्ध्या तासाच्या उपदेशपर भाषणात सौ.पुजाताई कुलकर्णी यांनी उपस्थित माता-पित्यांच्या समोर वर्तमान सामाजिक परिस्थितीचं चित्र उभा केलं.आज चंगळवादाचं युग आहे.लेकरं भोगवादाच्या आहारी जावुन बिघडु नयेत याची काळजी खऱ्या अर्थाने आई-वडिलांनी घेतली पाहिजे.लहानपणापासुन भारतीय संस्कृती,रीतिरिवाज एवढेच नव्हे तर मुलींनी कसं वागावं.? या संदर्भात आईने दक्ष राहिलं पाहिजे.शिक्षक ज्ञान देवू शकतात.मात्र दोन्ही कुळांचा नांवलौकीक वाढविणारी सक्षम कन्या एक उद्याची आदर्श महिला ही खऱ्या अर्थाने आपल्याच कुटुंबात आपणच घडवु शकतो असं त्यांनी सांगितलं.अलीकडे टि.व्ही. आणि मोबाईल या तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला असुन ज्यामुळे समाजात अनेक घटना घडताना आपण पाहतो.आपल्या लेकरावर चांगले संस्कार, चांगला आदर्श आपण जर लहान वयात मनात निर्माण करू शकलो तर उद्या येणाऱ्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देवु शकू.आई-वडिलांनी केवळ चालता बोलता नव्हे तर आपल्या पाल्यांसाठी स्वतंत्र वेळ काढुन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.मैत्रीच्या नात्यातुन लेकराचा सांभाळ आई- वडिलांनी केला तर खऱ्या अर्थाने कौटुंबिक आदान-प्रदान चांगली होवु शकते.पालकांनी सतत शाळेत संपर्क ठेवुन गुणवत्तेबाबत मुला-मुलींवर लक्ष ठेवणे महत्वाचे असते.भारतीय संस्कृती ही खऱ्या अर्थाने भावी नागरिक आदर्श आणि सक्षम बनवणारी आहे.व्यक्तिद्वेषातुन अवहेलना करत दुर्लक्षितपणे मुलं जेव्हा स्व-विचाराने वावरतात अशा वेळी अनेक संकटाचा सामना माता-पित्यांना करावा लागतो.मुला-मुलींना केवळ शाळेत पाठवणे यापेक्षा आपण त्यांच्या शालेय जीवनात दक्ष राहुन कशा प्रकारे लक्ष घालतो.? हे महत्वाचे असल्याचे सौ.कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना सौ.दराडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जवळपास 350 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने परस्पर झालेल्या संवादाचं महिलांनी कौतुक केलं.