बीड जिल्हाराजकारण

शिवभोजन योजना गरिबाचा अपमान करणारी, जेवायला बोलवायचं,अन्‌ स्वयंपाक संपला म्हणुन सांगायचं,ही तर जनतेची चेष्टा―भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रूपायात शिवभोजन सुरू केलेली योजना गरीबांचा अपमान करणारी असुन जेवायला बोलवायचं अन्‌ स्वयंपाक संपला म्हणुन सांगायचं असं चित्र आता या योजनेचं बनलं आहे. शिवभोजन केंद्रावर गेलेल्या गरजु आणि गरिब जनतेला पोटाच्या चार घासासाठी अपमानित प्रसंगाला सामोरे जावं लागतं.ते चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी अशोभनीय असुन केवळ देखावा करण्यासाठी योजना आहे की काय अशा प्रकारची टिका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

या योजनेचा पहिला टप्पा 26 जानेवारीपासुन सुरूवात झाल्यानंतर गेल्या दहा दिवसात शिवभोजन योजनेबाबत आलेल्या अनुभवावरून प्रसिद्धीसाठी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,ठाकरे सरकारची ही योजना असफल असुन राजकिय देखावा आहे. दहा रूपायात जेवण आणि त्यासाठी जीवाचा करावा लागणारा आटापिटा ती कसरतसुद्धा अशोभनीय आहे. ऑनलाईन नोंदणी करणं, आधारकार्ड दाखवणं,रांगेत उभा राहणं आणि मग केंद्र संचालकाकडुन त्याचा फोटो काढुन जेवणाचं टोकन मिळवणं आणि तेही एका दिवसात ऐंशी थाळी एकाच तासात संपते तेव्हा भुकेपोटी रांगेत उभ्या असलेल्या गोरगरीबांना मिळणारं उत्तर म्हणजे जेवणाचं आमंत्रण द्यायचं आणि स्वयंपाक संपला म्हणुन सांगायचं असंच आहे.रांगेत उभा असलेल्या लोकांना चार घास मिळणं तर सोडा याउलट अपमानाचे शब्द कानात घेवुन हिरमुसुन बाहेर पडावं लागतं.गेल्या दहा ते अकरा दिवसात एक हजारसुद्धा जेवणाचे ताट एका जिल्ह्यात होत नसतील तर योजनेचा गोरगरीबांसाठी किती टक्के फायदा खऱ्या अर्थाने आहे हा प्रश्न पडतो.महाराष्ट्र ही साधु संत आणि वारकरी संस्कृतीची भुमी आहे.अन्नदान मोठ्या प्रमाणे परस्परांना करणारा हा महाराष्ट्र आहे.मात्र याच राज्यात अशा प्रकारे अपमानित व चेष्टा करत गोरगरीबांच्या पोटाशी कुणी खेळत असेल तर ते सत्ताधाऱ्यांसाठी अशोभनीय आहे.तसं पाहता कष्टकरी, मजुर,कामगार,गोरगरीब हा घामाच्या जीवावर स्वाभिमानाने चार घास खाणारा वर्ग आहे. रात्रंदिवस काबाडकष्ट करून ऊसाच्या फडात, काट्याकुपाट्यात झोपडीत राहुन गरीब माणुस चार घास अन्न स्वाभिमानाने खातो.मात्र शासनाची दहा रूपयातलं शिवभोजन ही योजना खऱ्या अर्थाने असफल व सामाजिकदृष्ट्या वेदना देणारी आहे.केवळ राजकिय फायद्यासाठी निवडणुकीत दिलेलं वचन पाळायचं म्हणुन जर अशा प्रकारचा देखावा सत्ताधारी करीत असतील तर ते योग्य नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थाने राज्यातील गोरगरीबांची काळजी असेल तर ज्याप्रमाणे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर अन्नछत्र चालतं त्या धर्तीवर जिल्हा स्तरावर थाळीचा हिशोब न लावता दोन घास अन्नछत्र देण्याची व्यवस्था निर्माण करावी अशा प्रकारची मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.