अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द― दत्ताञय पाटील

स्व.डी.एन.पाटील शैक्षणिक संकुलात स्नेहसंमेलन, सेवागौरव समारंभ व पारितोषिक वितरण

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्व.डी.एन.पाटील यांनी 1960 साली ही संस्था स्थापन केली. स्व.आण्णांचा हा वारसा आपण यापुढेही चालवू,गोरगरीब कुटुंबातील व बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत असे सांगून आजच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांकडून खुप मोठ्या अपेक्षा ठेवल्यामुळे मुलांवर दडपण येते.मुलांना त्यांच्या पद्धतीने घडू द्या,जिथे अडचण येईल तिथे पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी,त्यांचा अभ्यास करून घ्यावा,तसेच गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत असे प्रतिपादन बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव दत्ताञय पाटील यांनी केले.श्री मुकूंदराज बालवाडी, प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकञित विद्यार्थी स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण, शिक्षकांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.

येथील श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्व.डी.एन.पाटील शैक्षणिक संकुल,रिंगरोड, अंबाजोगाई येथे श्री मुकूंदराज प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार,दि.8 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ,औरंगाबादचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय ज्ञानोबाराव पाटील हे तर विचारमंचावर संस्थेच्या सहसचिव विजयाताई पाटील, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,शिक्षण विस्तार अधिकारी पठाण मॅडम,केंद्रप्रमुख माणिकराव सोळंके,वसतीगृह संचालक जाधव,सोळंके, राठोड,मुख्याध्यापक शाहू गुळभिले,मुख्याध्यापिका के.एस.कोंडपल्ले,पर्यवेक्षक ए.एम.गडकर,श्री.मुकुंदराज कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.एम.तट आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी
गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सहसचिव सौ.विजयाताई दत्तात्रय पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपुर्ण अभ्यासातून आयुष्यात शिस्त आणावी व उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती साधावी असे आवाहन केले. संस्थेच्या वतीने सांघिक कबड्डी, खो-खो तसेच वैयक्तिक धावणे, लिंबु चमचा,थैला रेस,दोरीवरील उडया व रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देवून प्रोत्साहित करण्यात आले. तसेच यावेळी उत्कृष्ठ शैक्षणिक सेवा देवून सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शिक्षक अशोक पवार,विष्णुदास गडदे,दैवशाला निर्मळे, प्रकाशवती शिनगारे यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुष्पहार देवून सेवागौरव सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शाहू गुळभिले यांनी केले.तर पाहुण्यांचा परीचय पर्यवेक्षक ए.एम.गडकर यांनी करून दिला.तसेच सुत्रसंचालन के.एम.सोमवंशी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार बी.टी. सातपुते यांनी मानले.प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी स्व.ज्ञानोबाराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालवाडी वर्ग,इयत्ता 1 ली ते 12 वी वर्ग पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली,प्रबोधनपर गीते, देशभक्तीपर गीते,महाराष्ट्राची लोकधारा,लावणी,कोळीनृत्य, गोंधळी गीत,पोवाडा, बालनाटीका या सोबतच वैयक्तिक व समुह नृत्य कला अविष्कारावर आधारित गीते ही विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पिता व माता पालक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.स्नेहसंमेलन,सेवागौरव समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकूंदराज बालवाडी,प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला.