बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

उपळी येथे ग्रामीण रूग्णालय अथवा आरोग्य केंद्र तात्काळ मंजुर करण्याची जवान रंगनाथ चिरकेंची मागणी

तेलगाव:आठवडा विशेष टीम―
जि.प.गटाचे गाव असलेल्या उपळी येथे आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सोय नसल्याने येथील महिलांना दवाखान्यासाठी वडवणी, तेलगाव, बीड आदि ठिकाणी जावे लागते. तरी संबंधित लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन उपळी येथे सर्व सोयीसुविधा युक्त ग्रामीण रूग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी देऊन त्याचे काम तात्काळ चालु करावे. अशी मागणी उपळी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान रंगनाथ चिरके यांनी केली आहे.
यासंदर्भात उपळी ता.वडवणी येथील तरूण व सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान रंगनाथ चिरके यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपळी हे वडवणी तालुक्यातील मोठी लोकसंख्या व जि.प.गटाचे गाव असुन, या अनेक भौतिक सुविधा नसल्याने हे गाव विकासापासुन वंचित आहे. विशेष म्हणजे या गावात आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सोय नाही. त्यामुळे येथील महिलांसह इतर रूग्णांना उपचारासाठी बीड, माजलगाव, वडवणी, तेलगाव आदि ठिकाणी जावे लागते. यासाठी वेळ तर जातोच शिवाय खर्च ही वाढतो. त्यामुळे छोट्या आजारासाठी मोठा खर्च करावा लागतो.महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपळी येथे ग्रामीण रूग्णालय अथवा आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. परंतु शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे येथे आरोग्याचे कोणतीही सोय नाही. त्यामुळे येथे आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रूग्णालय अवश्यक आहे. विशेष ग्रामीण रूग्णालयासाठी दहा एकर जागा देण्यासाठी गावकरी तयार असुनही उदासिन राजकर्ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. उपळी येथे शासकीय गायरानात मोठ्या प्रमाणात जमिन उपलब्ध असुन,त्या जागे आरोग्याची सर्व सुविधा असलेली इमारत उभी राहु शकते. यामुळे शासनाचा मोठा खर्च वाचण्यासाठी मदत होणार.
तरी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांनी याची दखल घेऊन, उपळी येथील माता भगिनींच्या आरोग्याचा विचार करून, उपळी येथे तात्काळ ग्रामीण रूग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी देऊन त्याचे काम तात्काळ चालु करावे. अशी मागणी ही जवान रंगनाथ चिरके यांनी केली आहे.