अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

दगडू लोमटे यांना मारवा कला फाऊंडेशनचा गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― पुणे येथील मारवा कला फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार या वर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्य व सांस्कृतिक चळवळीत गेली अनेक वर्षे सातत्याने योगदान देणारे दगडू लोमटे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना मारवा कला फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच प्राप्त झाले आहे. सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दगडू लोमटे यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

मारवा कला फाऊंडेशन ही पुणे येथील संस्था गानमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांच्या नांवाने दरवर्षी पुरस्कार देते ही संस्था संगीताचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोंचले जावे व नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी कार्य करते.विद्यार्थी व संगीत क्षेत्रातील जाणकार व तज्ञ लोकांकडून संगीत कलेविषयी विविध प्रशिक्षणार्थ कार्यक्रम आयोजित करणे, गुणी कलाकार निर्माण करण्याचा प्रयत्न करणे,कलावंतांना प्रोत्साहीत करणे,प्रसंगी मदत, मार्गदर्शन करून कलाक्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी ही संस्था कार्य करीत आहे.त्रैमासिक मैफलींचे आयोजन करणे, त्यातून नावारूपाला येवू पाहणार्‍या व सांस्कृतीक क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तींना कै.गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार तसेच शिष्यवृत्ती प्रदान करून प्रोत्साहित करण्याचे काम हे फाऊंडेशन करीत आहे. यावर्षी हा पुरस्कार अंबाजोगाई येथील दगडू बाबुराव लोमटे यांना जाहीर झाला आहे.सदरील पुरस्काराचे वितरण 1 मार्च रोजी पुणे येथे एस.एम.जोशी सभागृहात सायंकाळी 6 वाजता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते तसेच माजी आमदार व पुणे येथील सांस्कृतिक संगीत व साहित्य क्षेत्रातील रसिकाग्रनी उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्तिथीत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.नाथराव नेरळकर यांचे अध्यक्षतेखाली प्रदान केला जाणार आहे.दगडू लोमटे हे अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे या सोबतच साधना सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत.तसेच लक्षवेध सामाजिक संस्था अंबाजोगाई,सांस्कृतिक विभाग मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद,ललित कला आकादमी अंबाजोगाईचे अध्यक्ष,युवान संस्था अहमदनगर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई केंद्र अंबाजोगाईचे उपाध्यक्ष तर मसाप,औरंगाबाद,भारत जोडो युवा आकादमी किनवट,युथ मिनिस्ट्रीचे सदस्य आणि नारायणराव काळदाते स्मृती प्रतिष्ठाणचे निमंत्रित सदस्य आहेत.लोमटे यांना यापुर्वी शब्द सह्याद्री साहित्य पुरस्कार (वाटा कवितेच्या) परभणी,बाबा आमटे व डॉ.एस.एन.सुब्बाराव यांच्या हस्ते उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार अहमदनगर,आद्यकवी मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, बाबा आमटे सामाजिक पुरस्कार,बीड आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.दगडू लोमटे यांनी बाबा आमटे यांच्या समवेत सन 1985 ते 1986 या कालावधीत कन्याकुमारी ते काश्मिर असा 6300 किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो अभियानात सहभाग घेतला.या सोबतच नॉर्थ ईस्ट मैत्री यात्रा अभियान,डॉ. एस.एन.सुब्बाराव यांच्या गांधी पीस फाऊंडेशन दिल्ली अंतर्गंत राष्ट्रीय युवा योजना शिबीरात तामिळनाडु,मध्यप्रदेश,मेघालय, राजस्थान,महाराष्ट्र येथे सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आनंदवन निर्मित स्वरानंदवन या संगीत रजनीचे अंबाजोगाईत पाच प्रयोग करून आनंदवनला सुमारे 7 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. श्रीलंका येथे 2011 साली आयोजित दक्षिण आशियायी मैत्री परिषदेत ते शिबीरार्थी म्हणुन सहभागी झाले आहेत.या शिवाय दै.मराठवाडा दैनिकाचे वार्ताहर व दै.सावजचे संपादक म्हणुन ही त्यांनी कार्य केले आहे.प्रासंगीक,ललित व काव्य लेखन करून त्यांनी दीर्घ पत्रलेखन केले आहे.मराठवाडा साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलन आयोजनात त्यांचा हिरीरीने सहभाग राहिला आहे.राजन खान यांच्या "अक्षर मानव" उपक्रमात ते सक्रिय सदस्य आहेत.साहित्य ,संगीत , सांस्कृतिक ,पत्रकारिता या क्षेत्रातील त्यांच्या एकुण योगदानाबद्दल मारवा कला फाऊंडेशन पुणे यांनी त्यांना यावर्षीचा गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार 2020 जाहीर केला आहे. यापुर्वी हा पुरस्कार प्रसिद्ध तबलावादक अविनाश पाटील, पुणे (2018) व प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान,पुणे (2019) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख पाच हजार रूपये रक्कम असे आहे.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल दगडू लोमटे यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.