सोयगाव,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दुसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्याची घोषणा शासनाने केली असतांना शुक्रवारी पोर्टलवर याद्या न आल्याने शासनाच्या डेडलाईनचा दावा अयशस्वी झाल्याने तालुका प्रशासन चिंतातूर तर शेतकरी मात्र हवालदिल झाले होते,याद्या येणार म्हणून शेतकऱ्यांनी बँकेच्या पायऱ्या झिजविल्या,परंतु अखेरीस दुपारी अचानक याद्या रद्द झाल्याचा संदेश मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते त्याहूनही वेगळी स्थिती प्रशासनाची झाली होती.पूर्वतयारीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या तालुका प्रशासनाच्या कृषी,महसूल आणि सहकार विभागाच्या यंत्रणा दुपारपर्यंत बुचकळ्यात पडल्या होत्या,त्यामुळे सोयगाव तालुक्यात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेसाठी तालुका प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांचे नावे बिनचूकपणे पोर्टलवर अपलोड करूनही अखेरीस शुक्रवारी देण्यात आलेली प्रशासनाची डेडलाईन अयशस्वी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता,सायंकाळी उशिरापर्यंत याद्या मिळतील असा ठोस दावा महसूल आणि सहकार विभागाने केला असतांना मात्र त्यांच्या हातात कर्जमाफीच्या याद्याच पडल्या नसल्याने अखेरीस रात्री उशिरापर्यंत याद्या मिळण्याच्या संकेत प्राप्त झाल्याने तालुका प्रशासनाने मात्र कामकाज बंद केले होते.दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मात्र बँकांमध्ये आणि आपले सरकार केंद्रावर आधार प्रमानिकीकरणासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या,परंतु याद्याच हाती न आल्याने आधार प्रमानिकीकरण कोणाचे करावे असा प्रश्न बँकांना आणि आपले सरकार केंद्र संचालकांना पडला होता.
तरीही प्रशासनाचा दावा ठोस-
सायंकाळी उशिरापर्यंत याद्या हाती न आल्याने तरीही रात्री दहा वाजेपर्यंत याद्या हातात पडण्याची शक्यता वर्तवून तालुका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या.रात्री उशिरापर्यंत याद्या हातात मिळतील असा ठोस दावा प्रशासनाने केला आहे.
कर्जमाफीच्या याद्या रद्द होण्यामागे कोणते करण असू शकते याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असतांना मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आगामी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या असल्याने या निवडणुका होणार्या जिल्ह्यांची तूर्तास कर्जमाफी योजनेतून वगळणी करण्यात येवून याद्या या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांच्या याद्या डाऊनलोड करण्याच्या कामाला विलंब होत असल्याने याद्या लांबणीवर गेल्याची चर्चा सुरु आहे.परंतु या चर्चेला कोणताही आधार मिळालेला नव्हता.