अपघातात मरण पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला धनंजय मुंडे यांनी केली 'नाथ प्रतिष्ठान' मार्फत रोख दोन लाख रुपयांची मदत

परळी (दि.०१):आठवडा विशेष टीम―परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील मयत शेतमजूर शेषेराव अण्णासाहेब दहिफळे (वय - ४५) हे फेब्रुवारी महिन्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले होते. आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतमजुराच्या कुटुंबास नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत रोख दोन लाख रुपये मदत केली.

परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या गावातील शेषेराव अण्णासाहेब दहिफळे हे कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांची पत्नी, मुक्ताबाई शेषेराव यांसह १ लहान मुलगा, मुलगी व आई पार्वतीबाई या परिवारावर उपासमारीची वेळ आली होती. उदरनिर्वाहसह मुलांच्या शिक्षणाचा खर्च आदी गंभीर समस्या होत्या.

ही बाब धनंजय मुंडे यांना समजताच त्यांनी सदर परिवाराला आपल्या परळी दौर्यादरम्यान बोलावून घेऊन, नाथ प्रतिष्ठान या त्यांच्या सामाजिक संस्थेमार्फत रोख दोन लाख रुपये मदत दिली आहे. यावेळी विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन कुलकर्णी यांसह पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे हे आमचे 'नाथ' आहेत, अशा शब्दात दहिफळे कुटुंबियांनी ना. मुंडे यांचे आभार मानले.

हजारो निवेदने व भेटणाऱ्यांची तोबा गर्दी...

दरम्यान आज एक दिवसाच्या परळी दौऱ्यावर आलेल्या ना. मुंडे यांच्या जनता दरबारात पुन्हा एकदा हजारो लोक आपली विविध कामे, समस्या, मागण्या आदींची निवेदने घेऊन आलेली पहायला मिळाली. जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील हजारो लोकांनी या दरबारामध्ये आपली गाऱ्हाणी ना. मुंडे यांच्यासमोर मांडली.

अनेक कामे जागीच मार्गी लावणाऱ्या ना. धनंजय मुंडे यांच्याकडून सामान्य माणसाच्या असलेल्या अपेक्षा या गर्दी व निवेदनांच्या वाढत्या संख्येवरून लक्षात येते.

Previous post गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयात मराठी गौरव दिन साजरा ; मराठी भाषा संवर्धनासाठी नव्या पिढीने योगदान द्यावे- प्रा.राम चौधरी
Next post अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा ― पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश