पाटोदा:आठवडा विशेष टीम―एक दिवस समाजासाठी फौंडेशनच्या वतीने शेकडो झोपड्या होणार सौर दिव्याने प्रकाशमय, शेकडो ऊसतोड मजुरांच्या परिवारांना प्रथमोपचार किट दिले जाणार भेट, शेकडो मुलांमुलींना भेट देणार शैक्षणिक किट व पुस्तके.. 23 जून 2019 रोजी चला गित्तेवाडी ला असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.. एक दिवस समाजासाठी, लढू या ऊसतोड मजूरांसाठी!!
या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ‘एक दिवस समाजासाठी, हजारो अधिकारी व व्यवसायिक धावले समाज सेवेसाठी’ अशी सामाजिक चळवळ उभी झाली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. एक दिवस समाजासाठी फौंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यातील हजारो अधिकारी व व्यवसायिक समाज सेवेसाठी सरसावले आहेत. समाजसेवेची आवड असूनही वैयक्तिक मर्यादामुळे समाजासाठी काही करू न शकल्याची खंत वाटणारे हजारो अधिकारी व व्यवसायिक एकत्र आले आणि त्यामधून एक दिवस समाजासाठी ही एक चळवळ उभी झाली आहे.
तन मन धन याद्वारे आपला कमीत कमी एक दिवस समाजासाठी द्यायला पाहिजे ही भावना या चळवळी मागील ताकद आहे. दर रविवारी श्रमदान, सोशल मीडिया, चर्चासत्रे, अभ्यास दौरे, वंचित घटकांशी संवाद या सर्व गोष्टीतून या फौंडेशन चा कार्य विस्तार होत आहे. ही संस्था प्रामुख्याने विद्यार्थी, महिला, ऊसतोड मजुर इत्यादीसाठी कार्यरत असून अल्प कालावधीत वेगवेगळे प्रश्न हाताळून नावलौकिक प्राप्त केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला, मदत, उपयोगी पुस्तकांचे मोफत वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवून हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे. तसेच ऊसतोड मजुरांच्या व्यथांचा प्रत्यक्ष अभ्यास करून ‘कधी थांबेल ही भटकंती’ हा माहितीपट सादर केला असून त्यांच्या समस्या वर उपाय काढायचा प्रयत्न केला आहे. प्रथमोपचार पेटी, सौर दिवा, मुलांना ङ्राईंगकिट, पुस्तके अशा वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप करून हजारो ऊसतोड मजुर, महिला व मुलांना मदतीचा हात दिला आहे. ही मदत गावात, ऊसाच्या फडावर व साखर कारखान्यावर प्रत्यक्ष जाऊन करण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांच्या वरील अत्याचाराविरोधात आवाज उठवून त्यांना प्रामाणिक साथ दिली आहे.
या संस्थेने एमपीएससी करणार्या गुणवत्ताधारक मुलींना आलेल्या अडचणीत खंबीर साथ देवून त्यांचा यशोमार्ग मोकळा करून दिला आहे.
तसेच बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील ३५ गावात सार्वजनिक वाचनालय सुरू व्हावे म्हणून पुस्तकाचे संच भेट देवून ही चळवळ १०० गावात राबविण्याचे आव्हान स्विकारले आहे. याच मोहिमेंतर्गत ‘पुस्तके वाचा आणि इतरांना वाचण्यासाठी भेट द्या’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला आहे.